ग्रामीण पोलिसांसाठी पंढरपुरात होणार कॅंटीन ! पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुतेंचा पोलिस महासंचालकांना प्रस्ताव 

तात्या लांडगे 
Thursday, 4 March 2021

सोलापूर ग्रामीण पोलिसांसाठी शहरात एखादी कॅंटीन सुरू करण्यासंदर्भात नियोजन सुरू होते. परंतु, शहर पोलिसांसाठी यापूर्वीच कॅंटीन सुरू झाल्याने शहरात ग्रामीण पोलिसांसाठी दुसरी कॅंटीन सुरू होण्यास अडचण होती. त्यामुळे पंढरपुरात कॅंटीन सुरू करण्यास परवानगी द्यावी, असा प्रस्ताव नव्याने पाठविण्यात आला आहे. 

सोलापूर : सोलापूर ग्रामीण पोलिस आणि शहर पोलिसांचे मुख्यालय एकच असल्याने ग्रामीण पोलिसांसाठी स्वतंत्र कॅंटीन सुरू होऊ शकली नाही. ग्रामीण पोलिसांसाठी कॅंटीन असावी, हा प्रस्ताव पोलिस महासंचालक कार्यालयाने यापूर्वीच अपात्र केला आहे. शहर पोलिसांच्या कॅंटीनचा वापर ग्रामीण पोलिसांनी करावा, असेही वरिष्ठांनी स्पष्ट केले. या पार्श्‍वभूमीवर आता पंढरपुरात वेल्फेअर फंडातून नवी कॅंटीन सुरू करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. 

साताऱ्यात ग्रामीण पोलिसांसाठी मोठी कॅंटीन सुरू करण्यात आली आहे. त्या ठिकाणी पोलिसांना साबणापासून वॉशिंग मशिनपर्यंत आणि सर्वच प्रकारचे खाद्यपदार्थ खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. सर्वच पोलिस कर्मचारी त्या ठिकाणाहून वस्तू खरेदी करतात. पोलिस कॅंटीनमधून वस्तू खरेदीवर मोठी सवलत दिली जाते. त्यामुळे सुरवातीला दररोजची उलाढाल 25 ते 30 हजारांपर्यंत होती. काही महिन्यांनी ती उलाढाल दीड लाखांवर पोचली. पाहता पाहता वर्षाचा टर्नओव्हर पाच कोटींपर्यंत गेल्याचा अनुभव पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी "सकाळ'शी बोलताना कथन केला. 

घरात लागणाऱ्या सर्व प्रकारच्या वस्तू एकाच छताखाली मिळत असल्याने खरेदीसाठी गर्दी वाढू लागली. सर्वच वस्तू पॅकिंगमध्ये मिळत असल्याने अवघ्या सहा कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ती कॅंटीन चालविली जात आहे. त्यातून पोलिस वेल्फेअर फंडही मोठ्या प्रमाणावर मिळू लागल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. त्या धर्तीवर सोलापूर ग्रामीण पोलिसांसाठी शहरात एखादी कॅंटीन सुरू करण्यासंदर्भात नियोजन सुरू होते. परंतु, शहर पोलिसांसाठी यापूर्वीच कॅंटीन सुरू झाल्याने शहरात ग्रामीण पोलिसांसाठी दुसरी कॅंटीन सुरू होण्यास अडचण होती. त्यामुळे पंढरपुरात कॅंटीन सुरू करण्यास परवानगी द्यावी, असा प्रस्ताव नव्याने पाठविण्यात आला आहे. पोलिस महासंचालकांची मान्यता मिळाल्यानंतर त्या ठिकाणी काम सुरू होईल, असा विश्‍वासही सातपुते यांनी या वेळी व्यक्‍त केला. 

पोलिस अंमलदार हाच खरा पोलिस दलाचा हिरो 
पोलिस अंमलदार हाच खरा पोलिस दलाचा हिरो आहे. त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी त्यांचे वाढदिवस साजरे करणे, त्यांना एक दिवसाची सुटीदेखील दिली जात आहे. त्यांना एकाच ठिकाणाहून सर्वच प्रकारच्या वस्तू, साहित्याची खरेदी करता येईल, या हेतूने पोलिस कॅंटीन सुरू करण्याचा प्रस्ताव पोलिस महासंचालक कार्यालयास पाठविला आहे. 
- तेजस्वी सातपुते,
पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण 

"ग्रामीण'मध्ये पेट्रोल पंपचे नियोजन 
सोलापूर शहरात ग्रामीण पोलिसांचा एक पेट्रोल पंप सुरू आहे. मात्र, ग्रामीण भागातील पोलिस कर्मचाऱ्यांची सोय व्हावी या हेतूने एखादा पेट्रोलपंप असावा म्हणून दोन-तीन तालुक्‍यांत जागांचा शोध सुरू करण्यात आला आहे. जागा निश्‍चित झाल्यानंतर ग्रामीण भागातही पोलिसांचा पेट्रोलपंप सुरू केला जाईल; जेणेकरून पोलिसांचा वेल्फेअर फंड वाढू शकतो. तत्पूर्वी, पोलिस महासंचालक कार्यालयाकडून रीतसर परवानगी घेतली जाणार आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now there will be a canteen in Pandharpur for the rural police