मोठी बातमी ! कोरोना बाधितांमध्ये पंधरा वर्षांपर्यंतच्या मुलांची संख्या कमीच ; 'यांनाच' कोरोनाचा सर्वाधिक धोका

2Child_Mask.jpg
2Child_Mask.jpg

सोलापूर : शहरातील कोरोना बाधितांची संख्या आता नऊ हजार 533 झाली आहे. त्यात 15 वर्षांपर्यंतच्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 815 असून मागील सहा महिन्यात त्यातील एका मुलाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या धास्तीने घराबाहेर न पडणारी मुले मात्र, कोरोनाच्या तावडीत सापडली नाहीत. दुसरीकडे कामानिमित्त घराबाहेर पडणारे 31 ते 50 वयोगटातील व्यक्‍ती सर्वाधिक कोरोना बाधित झाले आहेत.


14 एप्रिलला शहरात कोरोनाचे आगमन झाले आणि न्यू पाच्छा पेठेत पहिल्याच रुग्णाचा मृत्यू झाला. त्यानंतर प्रतिबंधित क्षेत्र करणे, सॅनिटायझरची फवारणी करणे, सार्वजनिक शौचालयांची सफाई सुरु झाली. शेजारील सर्वच जिल्ह्यांमध्ये कोरोना पोहचलेला असतानाही सोलापूर कोरोनापासून दूरच होता. मात्र, कमी कालावधीत मृत्यूदरात सोलापूर राज्यात अव्वल झाले. त्यानंतर तत्कालीन महापालिका आयुक्‍तांची उचलबांगडी करण्यात आली. नवनियुक्‍त आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी विविध प्रकारच्या उपाययोजना करुन कोरोनाचा संसर्ग कमी करण्याच्यादृष्टीने ठोस प्रयत्न केले. दरम्यान, शहरात आतापर्यंत सर्वाधिक मृत्यू 60 वर्षांवरील को- मॉर्बिड रुग्णांचा झाला आहे. 16 ते 30 वयोगटातील 15 तरुणांचा कोरोनाने बळी घेतला असून आतापर्यंत दोन हजार 93 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांची रोगप्रतिकारक शक्‍ती ज्यास्त असल्याने त्यांनी त्यावर यशस्वीपणे मातही केली. मात्र, 31 ते 60 वयोगटातील सर्वाधिक चार हजार 800 हून अधिक व्यक्‍तींना कोरोना झाला आहे. त्यातील पाणेदोनशे व्यक्‍तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


शहरातील कोरोनाची स्थिती 

  • वयोगट        पॉझिटिव्ह  मृत्यू 
  • 0-15              815          1 
  • 16-30           2,093      15 
  • 31-50           3,329      65 
  • 51-60           1,560     117 
  • 60 वर्षांवरील  1,736     335 
  • एकूण             9,533    533 


कामानिमित्तच घराबाहेर पडा अन्‌ काळजी घ्या 
घरात बसून ऑनलाइन शिक्षण घेणारी, घराबाहेर न पडणारी मुले कोरोनाच्या वक्रदृष्टीपासून चार हात लांबच राहिली. मात्र, कामानिमित्त तथा कामाशिवाय घराबाहेर पडणाऱ्यांना कोरोनाने हेरले आणि त्यांना कोरोनाची बाधा झाली. घराबाहेर पडल्यानंतर सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करणे, मास्कचा वापर कमी तथा केलाच नाही, अशांनाही कोरोनाचा संसर्ग झाला. तर काही वेळेस अशा व्यक्‍तींच्या संपर्कातून घरातील अनेकांना कोरोनाची बाधा झाल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे कामानिमित्त घराबाहेर पडणे आणि नियमांचे तंतोतंत पालन करणे हाच कोरोनापासून दूर राहण्याचा ठोस उपाय असल्याचेही महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी सांगतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com