"पदवीधर'च्या निवडणुकीत चुरस; मात्र "नोंदणी'त निरुत्साहामुळे पिलीवमध्ये मतदार नगण्यच !

शुभजित नष्टे 
Thursday, 26 November 2020

पुणे पदवीधर मतदार संघासाठी होणाऱ्या निवडणुकीत मतदार यादीत पिलीव परिसरातील अनेक पदवीधरांची नावे नसल्याने यंदा नगण्य मतदारच मतदानाचा हक्क बजावणार असल्याचे दिसून येत आहे. 

पिलीव (सोलापूर) : पुणे पदवीधर मतदार संघासाठी होणाऱ्या निवडणुकीत मतदार यादीत पिलीव परिसरातील अनेक पदवीधरांची नावे नसल्याने यंदा नगण्य मतदारच मतदानाचा हक्क बजावणार असल्याचे दिसून येत आहे. 

पुणे पदवीधर मतदार संघासाठी येत्या 1 डिसेंबरला मतदान होत आहे. या मतदार संघात अनेक उमेदवार असले तरी भाजपचे संग्राम देशमुख व राष्ट्रवादीचे अरुण लाड या दोघांमध्येच मुख्य लढत होत आहे. मात्र या निवडणुकीत पदवीधर मतदारांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मतदार नोंदणी सुरू होती, पण मतदार नोंदणीमध्ये निरुत्साह दिसून आला. बऱ्याच पदवीधरांनी ऑनलाइन नाव नोंदणी केली होती. आपले नाव मतदार यादीत येते का नाही, म्हणत अखेर काल प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीत नावे प्रसिद्ध झाली आहेत. पण गत निवडणुकीपेक्षा यंदा नावे अतिशय कमी आली आहेत. 

पिलीव परिसरात अनेक युवक - युवतींनी पदवीधर असूनही नाव नोंदणीच केली नसल्याने अनेक पदवीधर मतदानास मुकणार, हे मात्र निश्‍चित झाले आहे. या अगोदर एवढी चुरस नव्हती तेवढी यंदाच्या निवडणुकीत प्रचंड चुरस दिसून येत आहे. मुख्य भूमिका भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेस याबरोबरच अपक्ष उमेदवार पदवीधरांच्या गाठीभेटींवर भर देत आहेत. यंदा महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आहे. यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसचा समावेश आहे. यामुळे तिन्ही पक्ष एकत्र असल्यामुळे भाजपसमोर यंदाच्या निवडणुकीत तगडे आव्हान आहे. तर भाजप महायुतीमध्ये भाजप, आरपीआय, राष्ट्रीय समाज पक्ष, रयत क्रांती संघटना यांचा समावेश आहे. पण सध्या राष्ट्रीय समाज पक्षामध्ये नाराजी दिसून येत आहे. भाजप पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आम्हाला गृहीत धरले जात असून महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांचे फोटो सुद्धा पोस्टरवर नसल्याचे कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत. 

एकंदरीत, भाजप घटक पक्षांना जरी गृहीत धरत असले तरी आम्ही निश्‍चित भाजपला हिसका दाखवणार असल्याचे घटक पक्षांचे पदाधिकारी स्पष्ट बोलत आहेत. यावरून यंदाच्या पदवीधर निवडणुकीत काटेची टक्कर होणार हे मात्र निश्‍चित आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The number of graduate voters in the Piliv area is extremely low