दिवाळीनिमित्त श्री विठ्ठल मंदिराचे महाद्वार उघडले ! मात्र दर्शनासाठी मंदिर अद्याप खुले नाही 

अभय जोशी 
Friday, 13 November 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 17 मार्चपासून बंद असलेले श्री विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिराचे संत नामदेव पायरीजवळील महाद्वार (पितळी दरवाजा) दिवाळीच्या निमित्ताने उघडण्यात आला आहे. अद्याप श्री विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आलेले नसले तरी महाद्वार उघडले गेल्यामुळे भाविकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. 

पंढरपूर (सोलापूर) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 17 मार्चपासून बंद असलेले श्री विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिराचे संत नामदेव पायरीजवळील महाद्वार (पितळी दरवाजा) दिवाळीच्या निमित्ताने उघडण्यात आला आहे. अद्याप श्री विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आलेले नसले तरी महाद्वार उघडले गेल्यामुळे भाविकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 17 मार्चपासून दक्षता म्हणून श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आले आहे. तेव्हापासून संत नामदेव पायरीजवळील मंदिराचे महाद्वार देखील बंद ठेवण्यात आले होते. चंद्रभागा नदीवर स्नान करून भाविक जेव्हा महाद्वार घाटावरून श्री विठ्ठल मंदिराकडे येतात, तेव्हा याच महाद्वाराचे दर्शन भाविकांना होत असते. हे महाद्वार बंद असल्यामुळे भाविक संत नामदेव पायरीसमोर उभे राहून बाहेरूनच जड अंत:करणाने श्री विठुरायाला नमस्कार करत होते. 

कोरोनाचे रुग्ण कमी होत असल्यामुळे अनेक पातळ्यांवरील निर्बंध शासनाने हटवलेले आहेत. त्यामुळे श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर देखील भाविकांसाठी खुले करावे, अशी मागणी वारकरी संप्रदायातून होत आहे. अनेक वेळा या संदर्भात आंदोलने झाली आहेत; परंतु दक्षता म्हणून शासनाने मंदिर भाविकांसाठी खुले करण्याच्या सूचना दिलेल्या नाहीत. 

दरम्यान, संत नामदेव पायरीजवळील श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिराचा मुख्य दरवाजा नित्योपचार वेळापत्रकानुसार उघडण्यात यावा, अशी मागणी वारकरी संप्रदाय कार्तिकी यात्रा समन्वय समितीने श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीकडे केली होती. त्याची दखल घेऊन मंदिर समितीने सकारात्मक प्रतिसाद देत दिवाळीच्या मुहूर्तावर मंदिराचे महाद्वार जे सणांचा एक-दोन दिवसांचा अपवाद वगळता अनेक महिन्यांपासून बंद होते ते आज उघडले आहे. हे महाद्वार यापुढे भाविकांसाठी दर्शन सुरू होईपर्यंत दररोज दिवसभर उघडे ठेवावे, अशी वारकरी मंडळींची मागणी आहे. मंदिर समिती त्यावर काय भूमिका घेते, याविषयी उत्सुकता आहे. 

वारकरी पाईक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राणा महाराज वासकर आणि राष्ट्रीय प्रवक्ते राम कृष्ण महाराज वीर म्हणाले, की श्री विठ्ठल मंदिराचे महाद्वार उघडले गेल्यामुळे श्रीक्षेत्र पंढरपूर व संपूर्ण वारकरी संप्रदायात चैतन्याची लाट उसळली आहे. भगवान पंढरीरायाची कृपादृष्टी आपल्यावर पडते आहे, ही भावना तमाम विठ्ठलभक्तांची झाली आहे. 

"विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी। 
पूर आला आनंदाचा । लाटा उसळती प्रेमाच्या।।' 

या संत उक्तीप्रमाणे आता श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर भाविकांसाठी खुले होईल. भाविकांना मंदिरात जाऊन विठुरायाचे दर्शन घेता येईल आणि भगवान विठ्ठलाची आणि भक्तांची भेट होईल, अशी आशा आहे. 

श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सर्व सहकारी समिती सदस्य, कार्यकारी अधिकारी विठ्ठल तथा सुनील जोशी, प्रांताधिकारी सचिन ढोले या सर्वांनी सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल वारकरी व महाराज मंडळींतून समाधान व्यक्त होत आहे. 

श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल तथा सुनील जोशी म्हणाले, श्री विठ्ठल मंदिर अद्याप भाविकांसाठी खुले करण्यात आलेली नाही तथापि पाडवा आणि अक्षय तृतीयादिवशी पितळी दरवाजा उघडला होता. दिवाळीमध्ये स्थानिक नागरिक संत नामदेव पायरीजवळ दर्शनासाठी मोठ्या संख्येने येतात, हे लक्षात घेऊन आता दिवाळी संपेपर्यंत हा दरवाजा दिवसभर उघडा ठेवला जाणार आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: On the occasion of Diwali, the main entrance of Shri Vitthal temple was opened