गाव कोरोनाच्या भितीखाली तर अधिकारी दारूच्या नशेत झिंगाट; चक्क ग्रामपंचायत कार्यालयात रंगली पार्टी 

Officers liquor party at Vairag Gram Panchayat office
Officers liquor party at Vairag Gram Panchayat office

वैराग (सोलापूर) : गेली तीन-चार दिवसापासून गावात कोरोनाचा रुग्ण आढळल्याने वैराग (ता. बार्शी) ग्रामस्थ चिंतेत आहेत. तर दुसरीकडे वैराग ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी, कार्यालय अधीक्षक, पाणीपुरवठा अभियंता व मुख्य लिपीक मात्र दारूच्या नशेत धूंद आहेत. या अधिकाऱ्यांनी गाव बंद असल्याचा फायदा घेत चक्क ग्रामपंचायत कार्यालयातच दारू रिचवली अन्‌ आपल्या बेजबाबदारपणाचा कळस केला. यावर आता कोणती कारवाई होणार याकडे वैरागकरांचे लक्ष लागले आहे. 
वैरागमध्ये एका किराणा व्यापाऱ्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून त्याच्या संपर्कात असणाऱ्यांचे रिपोर्ट अजून यायचे बाकी असताना वैराग ग्रामपंचायत कार्यालयात एक दारुची पार्टी रंगली आणि लागलीच त्या पार्टीचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाल्याने बार्शी तालुक्‍यात खळबळ उडाली आहे. कोरोनामुळे वैराग पूर्ण सील असताना ग्रामपंचायत कार्यालयत पार्टी रंगते कशी, हा प्रश्न असून गावचा गाडा हाकणारे जर बेजबाबदार वागत असतील तर विश्वास कोणावर ठेवायचा हाही खरा प्रश्न आहे. 
वैराग ग्राम पंचायतीचा हा असंवेदनशीलतेचा खरा चेहरा या निमित्ताने दिसून आला आहे. एकीकडे संपूर्ण जग कोरोनाशी लढताना प्रत्येक जण जमेल तो प्रयत्न करताना आपण पाहत आहोत. महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सोलापूर जिल्ह्यात आकडे वाढत आहेत. त्याचा शिरकाव वैरागसह बार्शी तालुक्‍यातही झाला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून वैरागला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले. 
एकीकडे जिल्हा प्रशासन आणि तालुका प्रशासन रात्रंदिवस राबत आहे आणि स्थानिक वैराग ग्रामपंचायत प्रशासनातील वैरागचे ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी अनिल बारसकर, कार्यालयीन अधीक्षक विलास मस्के, बांधकाम व पाणीपुरवठा अभियंता रामभाऊ जाधव, लिपिक अमजद शेख हे वैराग ग्रामपंचायत कार्यालयात दारूच्या पार्ट्या करत असल्याचे आज समोर आले आहे. तसेच या पार्टीचा व्हीडिओ आणि फोटो आज सोशल मीडियावर व्हायरल झाले. पोलिस अधीक्षक बार्शी दौऱ्यावर आले असतानाच अधिकाऱ्यांना दारू, गुटखा अशा अवैध धंद्यांवर कारवाई करा, असे सांगून गेले. हे सर्व खोट ठरवत प्रतिबंधित क्षेत्रात दारू कशी मिळते, कार्यालयात दारू कोठून येते, पार्ट्या ऑफीसमध्येच कशा होतात, या लोकांना दारूचा पुरवठा कोण करते अशा अनेक सवाल उपस्थित होत असून स्थानिक पोलिसांच्या कामाबद्दल देखील या निमिताने प्रश्नचिन्ह निर्माण होतो आहे. 
वैरागमधील नागरिकांकडून या घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत असून आणि अशा बेजबाबदार कर्मचाऱ्यांना योग्य ते शासन मिळाले पाहिजे, अशी मागणी काही वैराग भागातील जाणकार मंडळी करत आहेत. या असंवेदनशील प्रकारात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी लक्ष घालून कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com