बार्शी-सोलापूर रोडवर वैरागजवळ भीषण अपघात; एक तरूण जागीच ठार तर चारजण जखमी 

कुलभूषण विभुते 
Tuesday, 27 October 2020

वैरागपासून काही अंतरावर असणाऱ्या कॅनव्हास फॅक्‍टरीजवळ आल्यानंतर चालकाचा गाडीवरील ताबा सुटून गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन झाडावर आदळल्याने हा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की त्यात एक जण जागीच ठार झाला तर चौघेजण जखमी झाले आहेत. 

वैराग (सोलापूर) : बार्शी- सोलापूर रोडवर वैरागच्या जुन्या कॅनव्हास फॅक्‍टरीजवळ कार झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघात एक जण जागीच ठार झाला तर चौघेजण गंभीर जखमी झाले. हा अपघात मंगळवार सायंकाळी रोजी पाच वाजण्याच्या सुमारास घडला. 

मयूर बापू कांबळे (वय 22, रा. बीबीदारफळ, ता. उत्तर सोलापूर) असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. तर आदित्य सुरेश कांबळे (रा. बीबीदारफळ), वाहन चालक ईश्वर तम्मा संगेकर, शैलेश देवकर, जुगल जानू कदम (रा. वैराग, ता. बार्शी) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. जखमींना उपचाराठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. बीबीदारफळ (ता. उत्तर सोलापूर) येथील मयूर कांबळे व आदित्य कांबळे हे दोघे वैराग येथे दुचाकीवरून कामानिमित्त आले होते. तिथे त्यांचे नियोजन बदलले. त्यांनी दुचाकी तिथेच ठेवून वैराग येथील मित्रासह एमएच 13/डीएम 0473 या क्रमांकाची कार घेऊन वैरागच्या तीन मित्रांसमवेत सोलापूर रोडकडे निघाले होते.

वैरागपासून काही अंतरावर असणाऱ्या कॅनव्हास फॅक्‍टरीजवळ आल्यानंतर चालकाचा गाडीवरील ताबा सुटून गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन झाडावर आदळल्याने हा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की त्यात एक जण जागीच ठार झाला तर चौघेजण जखमी झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत वैराग पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा नोंदवण्याचे काम चालू होते. 

संपादन : वैभव गाढवे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One killed three injured in road mishap on Barshi Solapur road