esakal | मुसळधार पावसाने आलेल्या पुरात चालकासह एक कार, दोन मोटारसायकली गेल्या वाहून
sakal

बोलून बातमी शोधा

One person went missing in Pandharpur taluka on Wednesday due to torrential rains

पंढरपूर व सांगोला तालुक्यातील अनेक भागात बुधवारी (ता. 16) रात्री मुसळधार पाऊस झाल्याने कासाळ नदीला पूर आला आहे.

मुसळधार पावसाने आलेल्या पुरात चालकासह एक कार, दोन मोटारसायकली गेल्या वाहून

sakal_logo
By
भारत नागणे

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर व सांगोला तालुक्यातील अनेक भागात बुधवारी (ता. 16) रात्री मुसळधार पाऊस झाल्याने कासाळ नदीला पूर आला आहे. 

दरम्यान शिंगोर्णी येथून एक चारचाकी गाडी वाहून गेली आहे. यामध्ये चालक वाहून गेला आहे. अचानक झालेल्या ढगफूटीमुळे या भागात हाहाकार उढाला आहे. गेल्या वीस वर्षानंतर या भागात मोठा पाऊस झाला आहे. मुसळधार पावसामुळे कासाळ ओढ्याला पूर आला असून पूराच्या पाण्यात  अनेक पीके वाहून गेली आहेत.

नदीकाठचे विजेचे खांब देखील वाहून गेल्याने नदीकाठच्या आठ ते दहा गावांचा वीज पुरवठा खंडीत झाला आहे. दरम्यान उपरी येथील पंढरपूर- सातारा राष्ट्रीय महामार्गावरील पुलाला धोका निर्माण झाला आहे. रात्री अचानक परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने ऊस, डाळींब, पपई या शेती पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे.

मागील तीन चार दिवसांपासून या भागात जोरदार पाऊस सुरू आहे. पुरामुळे नदीवरील अनेक बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर पळशी, सुपली, गार्डी या गावांचा थेट संपर्क ही तुटला आहे. पाण्याच्या प्रवाहामध्ये एक चारचाकी गाडीसह दोन मोटारसायकली वाहून गेल्या आहेत. वाहून गेलेल्या एकाचा शोध सुरू आहे. प्रशासनाने नदीकाठच्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. भीमानदीच्या पाणी पातळीत देखील मोठी वाढ झाल आहे.

संपादन : अशोक मुरुमकर