विरोधी पक्षनेते शिवसेनेचे अन्‌ हजेरी दोन्ही कॉंग्रेस नेत्यांचीच ! अमोल शिंदेंनी घेतला पदभार

20210111_191615.jpg
20210111_191615.jpg

सोलापूर : महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी शिवसेनेचे नगरसेवक अमोल शिंदे यांची आज निवड झाली. महेश कोठे यांनी त्यांच्याकडील पदभार शिंदे यांच्याकडे सोपविला. विशेष म्हणजे यावेळी शिवसेनेच्या नगरसेवकांच्या तुलनेत कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि एमआयएमच्या नगरसेवकांचीच सर्वाधिक गर्दी पहायला मिळाली. कोठेंच्या काळात महाविकास आघाडीचे नेते एकत्रित पहायला मिळाले नाहीत. मात्र, शिंदे यांच्या स्वागताला दोन्ही कॉंग्रेस, एमआयएमचे नेतेमंडळी एकत्रित आल्याचे पहायला मिळाले.

'यांची' होती प्रमुख उपस्थिती
विद्यमान विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांच्या स्वागतावेळी तत्कालीन विरोधी पक्षनेते महेश कोठे, शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, गणेश वानकर, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले, राष्ट्रवादीचे माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, कॉंग्रेसचे गटनेते चेतन नरोटे, स्थायी समितीच्या सभापती अनुराधा काटकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते किसन जाधव, माजी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती कुमूद अंकाराम, माजी परिवहन सभापती संकेत पिसे, माऊली पवार, शिवसेनेचे उपशहरप्रमुख प्रताप चव्हाण, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संतोष पवार, एमआयएमचे तौफिक शेख आदींनी यावेळी उपस्थिती दर्शविली.

चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महापालिकेतील विरोधी पक्षनेता बदलला आहे. शिवसेनेचा धनुष्य खाली ठेवून तत्कालीन विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची वाट धरली. तत्पूर्वी, कोठे यांनी विभागीय आयुक्‍तांकडील गट स्थापनेचा तिढा सोडविला. महापालिकेतील महापौर, उपमहापौर आणि सभागृह नेते बदलले, परंतु विरोधी पक्षनेतेपदी कोठे कायम होते. जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, गणेश वानकर यांनी कोठे यांना पदावरुन हटविण्याबद्दल तोंडावर बोट ठेवले. परंतु, पक्षाच्या बैठकीत ठरल्यानंतरही कोठे यांनी चार वर्षे विरोधी पक्षनेतेपद स्वत:कडेच ठेवले. त्यांनी पक्षातील नेत्यांबद्दल नाराजी व्यक्‍त करीत राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला आणि जाताना ठरल्याप्रमाणे अमोल शिंदे यांना विरोधी पक्षनेतेपद दिले. दरम्यान, कोठे सोयीचे राजकारण करतात, असा आरोप करणाऱ्यांनीही शिंदे यांच्या महापालिकेतील स्वागताला आवर्जुन उपस्थिती दर्शविली. पदभार स्वीकारताना शिवसेनेच्या नगरसेवकांच्या तुलनेत कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि एमआयएमच्याच नेत्यांची मोठी गर्दी होती. तरीही आपण पक्षाला न्याय देऊ, नगरसेवकांना अधिकाधिक भांडवली निधी मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com