पंढरपुरात कोविड हॉस्टिपल करण्यावरून पेच; उपजिल्हा रूग्णालयाला विरोध 

Opposition to making Pandharpur Sub District Hospital Kovid Hospital
Opposition to making Pandharpur Sub District Hospital Kovid Hospital

पंढरपूर (जि. सोलापूर) : पंढरपुरातील उपजिल्हा रुग्णालयाला कोविड 19 हॉस्पिटल करण्यास त्या भागातील लोकांनी आज सायंकाळी तीव्र विरोध दर्शवला. त्यामुळे प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे. 
कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाने कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी राज्यभरातील कोणकोणत्या हॉस्पिटलमध्ये उपचार केले जाऊ शकतील, याविषयीचा आढावा घेतला होता. सोलापुरात रुग्णांची संख्या वाढली तर पर्याय म्हणून पंढरपुरातील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार केले जावेत, यादृष्टीने जिल्हाधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सकांनी हालचाली सुरू केल्या होत्या. त्यावेळी पंढरपुरातील उपजिल्हा रुग्णालयात विविध प्रकारचे आजार असलेले शेकडो रुग्ण दररोज उपचारासाठी येतात. अशा परिस्थितीत जर उपजिल्हा रुग्णालयात कोरोनाचे रुग्ण उपचारासाठी दाखल केले तर मग तिथे उपचारासाठी येणाऱ्या अन्य रुग्णांची गैरसोय होईल. कोरोना रुग्णांसाठीचे हॉस्पिटल म्हणून ते ओळखले जाऊ लागले तर कोरोना संसर्गानंतर या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी कोणी जाणार नाही. त्यामुळे पंढरपुरातील उपजिल्हा रुग्णालयाऐवजी सोलापुरातील हॉस्पिटलमध्ये कोरोनाच्या रुग्णांवर उपचार केले जावेत, अशी भूमिका आमदार भारत भालके यांनी घेतली होती. जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यासह सर्वांना त्यांनी यासंदर्भात कळवले होते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पंढरपूर शहरातील काही खासगी रुग्णालयांचा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी विचार सुरू केला होता. दरम्यान, चार दिवसांपूर्वी मुंबई येथून तालुक्‍यातील उपरी गावात आलेल्या एका व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्या रुग्णाला सोलापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर प्रशासनाने पंढरपुरातील भक्ती मार्गावरील जनकल्याण हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करण्याचा निर्णय घेतला आणि उपरीमधील संबंधित रुग्णाला सोलापूरवरून पंढरपुरातील जनकल्याण हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. 
जनकल्याण हॉस्पिटलच्या परिसरात सहा ते सात वेगवेगळी खासगी हॉस्पिटल आहेत. तसेच तिथे लगत मोठ्याप्रमाणावर लोकवस्ती आहे. त्यामुळे जनकल्याण हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार केले जाऊ नयेत, अशी भूमिका त्या भागातील कार्यकर्ते दीपक वाडदेकर यांनी घेतली. प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी या प्रकाराविषयी जिल्हाधिकाऱ्यांना संपर्क साधून माहिती दिली, तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित रुग्णास परत सोलापूरला पाठवण्यास सांगितले आणि अखेर तो रुग्ण पुन्हा सोलापुरातील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला. 
या पार्श्‍वभूमीवर सोलापूर येथील कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने प्रांताधिकारी श्री. ढोले यांनी आमदार भारत भालके यांच्यासमवेत आज दुपारी पुन्हा बैठक घेतली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार श्री. भालके यांनी उपजिल्हा रुग्णालय आणि तिथे लगत असलेल्या कॉलरा हॉस्पिटलमध्ये 150 खाटांवर कोरोना रुग्णांवर उपचार करण्यास संमती दिली. त्यानुसार प्रशासनाने उपजिल्हा रुग्णालयात तयारी सुरू केली. त्याची माहिती त्या भागात राहणारे माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट, विद्यमान नगरसेवक विक्रम शिरसट, नगरसेवक अक्षय गंगेकर यांना समजली आणि मग त्यांनीही आमच्या भागात लोकवस्ती आहे. या ठिकाणी कोरोना रुग्णांना उपचारासाठी आणू नका अशी भूमिका घेत विरोध दर्शवला. यावेळी त्या भागातील अनेक लोक तिथे विरोध करण्यासाठी एकत्र जमले. त्यामुळे आता अशा परिस्थितीत कोविड- 19 हॉस्पिटल पंढरपुरात नेमके कुठे सुरू करावयाचे, असा पेच प्रशासनापुढे निर्माण झाला आहे. 

65 एकरांत सोय करावी 
नदीच्या पैलतीरावरील 65 एकर परिसरात कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी तातडीने आवश्‍यक यंत्रणा उभा करावी, अशी मागणी पुढे येऊ लागली आहे. परंतु अगदी ऐनवेळी आता तिथे अशा पद्धतीची यंत्रणा कशी उभी करावयाची, असा प्रश्‍न अधिकाऱ्यांमधून विचारला जाऊ लागला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com