पालख्या दशमीला पंढरपुरात पोचणारच

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 मे 2020

आज पुणे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत आळंदी, देहू, पंढरपूर देवस्थानचे पदाधिकारी, मानकरी यांची बैठक झाली.

नातेपुते (जि. सोलापूर) ः विविध संतांच्या पादुका पंढरपूरला विमान, हेलिकॉप्टर की बस यापैकी कशाने पोचवायच्या, हा निर्णय सरकार सर्वांना विश्‍वासात घेऊन घेईल. पण संतांच्या पालख्या, पादुका दशमीला पंढरपुरात पोचणार, ही जबाबदारी माझी, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगितले. 

आज पुणे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत आळंदी, देहू, पंढरपूर देवस्थानचे पदाधिकारी, मानकरी यांची बैठक झाली. यावेळी आषाढी पायी वारी परंपरा अखंडित ठेवण्यासाठी व श्री संत शिरोमणी ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पादुकांच्या दर्शनार्थ होणारी गर्दी टाळण्यासाठी माऊलींच्या पादुका आषाढ शुद्ध दशमीला 30 भाविकांसह थेट पंढरपूरला न्याव्यात व प्रातिनिधिक 70 वारकऱ्यांच्या समवेत एका पायी दिंडीला परवानगी देण्यात यावी, अशी मागणी श्री संत शिरोमणी ज्ञानेश्‍वर महाराजांचे वंशपरंपरागत चोपदार राजाभाऊ व रामभाऊ चोपदार यांनी बैठकीत आग्रहाने केली. 

यावेळी श्री. चोपदार बंधू म्हणाले, की असा सोहळा झाला तर वारीबरोबर वर्षानुवर्षे होणाऱ्या सर्व सेवा या शासनाचे सर्व नियम पाळून करता येणे शक्‍य आहे. दिंडीसोबत पादुका नसल्यामुळे दर्शन व्यवस्था व त्यासाठी होणारी गर्दी याचे नियोजन करणे याची आवश्‍यकता राहणार नाही. यामुळे कोणत्याही अडचणीमुळे वारीची परंपरा खंडित झाली असा संदेश जाणार नाही. शासन जो निर्देश देईल तो मान्य करण्याचे बहुसंख्य वारकऱ्यांची भूमिका आहे. 

यावेळी पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलिस अधीक्षक संदीप पाटील, ज्ञानेश्‍वर महाराज संस्थानचे अभय टिळक, ऍड. विकास ढगे, योगेश देसाई, तुकाराम महाराज संस्थानचे संजय मोरे, माणिक मोरे, विशाल मोरे, संजय मोरे, पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, पंढरपूर मंदिर समितीचे सदस्य शिवाजी मोरे, ऍड. माधवी निगडे, श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलिस अधीक्षक मनोज पाटील, सातारचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील उपस्थित होते. 

यावेळी बैठकीत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे माणिक मोरे देहूकर यांनी पादुका थेट न्याव्यात, परंतु प्रातिनिधिक पायी व्हावी अशी भूमिका मांडली. पालखी सोहळ्याचे मालक, हैबतबाबांचे वंशज बाळासाहेब आरफळकर यांनी ज्ञानेश्‍वरी डोक्‍यावर घेऊन पायी जावे असे सांगितले. श्री. विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी विठ्ठल मंदिर आषाढ पौर्णिमेपर्यंत बंद ठेवावे, असा आदेश काढावा, असे सुचवले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The palanquin will reach Pandharpur on Dashmi