पंढरपुरात पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी आठ हजार 151 मतदार; 20 मतदान केंद्रांवर होणार मतदान 

भारत नागणे 
Saturday, 14 November 2020

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पंढरपूर तालुक्‍यातील निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी तालुक्‍यात 8 हजार 151 मतदार असून, मतदानासाठी 20 मतदान केंद्रांवर सोय करण्यात आली असल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली. 

पंढरपूर (सोलापूर) : पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पंढरपूर तालुक्‍यातील निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी तालुक्‍यात 8 हजार 151 मतदार असून, मतदानासाठी 20 मतदान केंद्रांवर सोय करण्यात आली असल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली. 

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी तालुक्‍यात पदवीधर मतदार संघासाठी 5 हजार 122 पुरुष व 1 हजार 338 स्त्री असे एकूण 6 हजार 460 मतदार आहेत. तर शिक्षक मतदारसंघासाठी 1 हजार 388 पुरुष व 303 स्त्री मतदार असून, असे एकूण 1 हजार 691 मतदार आहेत. तालुक्‍यात असे एकूण 8 हजार 151 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 

पदवीधर मतदारसंघासाठी 12 मतदान केंद्रे तर शिक्षक मतदारसंघासाठी 8 मतदान केंद्रांवर मतदानाची सोय करण्यात आली आहे. पदवीधर मतदारसंघासाठी द. ह. कवठेकर प्रशाला, पंढरपूर - 5, कासेगाव - 1, करकंब - 2, भाळवणी - 1, पुळूज - 1, तुंगत - 1 तर पटवर्धन कुरोली - 1 येथील 12 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. तर शिक्षक मतदारसंघासाठी द. ह. कवठेकर प्रशाला, पंढरपूर - 2, कासेगाव - 1, करकंब - 1, भाळवणी - 1, पुळूज - 1, तुंगत - 1 तर पटवर्धन कुरोली - 1 येथील 8 मतदान केंद्रांवर मतदान होणार असल्याचेही प्रांताधिकारी ढोले यांनी सांगितले. 

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. निवडणुकीसाठी 299 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. यासाठी 29 मतदान केंद्राध्यक्ष, 56 सहाय्यक मतदान केंद्राध्यक्ष, 120 मतदान अधिकारी तर 94 शिपाई कर्मचारी यांची नियुक्ती केली आहे. दाखल केलेले उमेदवारी अर्ज 17 नोव्हेबरपर्यंत मागे घेता येणार आहेत. मतदान 1 डिसेंबरला सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत होणार आहे. तर मतमोजणी 3 डिसेंबरला होणार आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार 700 पेक्षा जास्त मतदार संख्या असलेल्या केंद्रासाठी सहाय्यकारी मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. यामध्ये पदवीधरांसाठी करकंब तर शिक्षकांसाठी द. ह. कवठेकर प्रशाला येथे प्रत्येकी एक मतदान केंद्र तयार करण्यात आले आहे. सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोरोनाच्या आजाराबाबत दिलेल्या सूचनांचे पालन करून आपली जबाबदारी पार पाडावी, अशा सूचनाही श्री. ढोले यांनी दिल्या. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Pandharpur, polling will be held at 20 polling stations for graduate and teacher constituencies