
आध्यात्मिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूर शहरात आणि तालुक्यात अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, संत कैकाडी महाराज मठ, संत तनपुरे महाराज आणि संत गजानन महाराज मठ यांशिवाय अलीकडेच भीमा नदीच्या पैलतीरावर उभारलेले इस्कॉनचे राधा पंढरीनाथ मंदिर आणि प्रभुपाद घाट, शेकडो पक्ष्यांनी बहरलेला यमाई तलाव आणि त्या काठचे तुळशी वन उद्यान आवर्जून पाहण्यासारखे आहे. तालुक्यातील नारायण चिंचोली येथील श्री सूर्यनारायण मंदिर, भाळवणी येथील श्री शाकंबरी मंदिर, अंतापूर येथील श्री महादेव मंदिर यांसारखी प्राचीन मंदिरे पाहण्यासारखी आहेत.
पंढरपूर (सोलापूर) : आध्यात्मिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूर शहरात आणि तालुक्यात अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, संत कैकाडी महाराज मठ, संत तनपुरे महाराज आणि संत गजानन महाराज मठ यांशिवाय अलीकडेच भीमा नदीच्या पैलतीरावर उभारलेले इस्कॉनचे राधा पंढरीनाथ मंदिर आणि प्रभुपाद घाट, शेकडो पक्ष्यांनी बहरलेला यमाई तलाव आणि त्या काठचे तुळशी वन उद्यान आवर्जून पाहण्यासारखे आहे. तालुक्यातील नारायण चिंचोली येथील श्री सूर्यनारायण मंदिर, भाळवणी येथील श्री शाकंबरी मंदिर, अंतापूर येथील श्री महादेव मंदिर यांसारखी प्राचीन मंदिरे पाहण्यासारखी आहेत.
श्री विष्णुपद व श्री नारद मंदिर
पंढरपूरला श्री विठ्ठलाच्या दर्शनाच्या निमित्ताने दरवर्षी लाखो वारकरी भाविक येत असतात. चंद्रभागेत स्नान करून विठुरायाचे दर्शन घेऊन तृप्त होणारे वारकरी शहरातील संत कैकाडी महाराज, संत तनपुरे महाराज, चंद्रभागा नदी पात्रातील श्री विष्णुपद आणि त्याजवळच्या गोपाळपूरला जातात. मार्गशीर्ष महिन्यात श्री विठ्ठलाचा मुक्काम श्री विष्णुपद येथे असतो, अशी आख्यायिका आहे. त्यामुळे दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात विष्णुपदावर भाविकांची गर्दी असते. पंढरपूरचे हजारो नागरिक देखील मार्गशीर्ष महिन्यात विष्णुपद मंदिराच्या परिसरात वनभोजनाचा आनंद घेण्यासाठी गर्दी करतात. भीमा नदीपात्रातील विष्णुपद मंदिर आणि त्यासमोर नदी पात्रातच असलेले श्री नारद मंदिर देखील वैशिष्ट्यपूर्ण आहे.
पंढरपूरच्या वैभवात भर इस्कॉनचे श्री राधा पंढरीनाथ मंदिर
चंद्रभागा नदीच्या पैलतीरावर इस्कॉनच्या वतीने अतिशय सुंदर असे श्री राधा पंढरीनाथ मंदिर बांधण्यात आले आहे. या मंदिराच्या परिसरातील वातावरण अतिशय विलोभनीय आहे. मंदिरात वर्षभर सातत्याने मोठ्या भक्तिभावाने धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्या मंदिराच्या शेजारीच नदीच्या पैलतीरावर श्री प्रभुपाद घाटाची उभारणी इस्कॉनने केली आहे. अतिशय सुंदर रचना असलेल्या या घाटामुळे पंढरपूरच्या वैभवात मोठी भर पडली आहे. चंद्रभागा नदी आणि वाळवंटाचे सौंदर्य त्यामुळे आणखी वाढले आहे. होडीतून या घाटाकडे आणि मंदिराकडे जाता येते, त्याचबरोबर पुलावरून देखील जाता येते.
वृक्षवल्लीने सजलेला व पक्ष्यांच्या किलबिलाटाने बहरलेला प्राचीन यमाई तलाव
पंढरपूर रेल्वे स्थानकाच्या समोरील बाजूस प्राचीन यमाई तलाव अनेक वर्षे दुर्लक्षित होता. आमदार प्रशांत परिचारक यांनी काही वर्षांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करून सरोवर संवर्धन योजनेतून यमाई तलावासाठी निधी मंजूर करून घेतला. त्या माध्यमातून काही कामे करण्यात आली. पंढरपूर नगरपालिकेने देखील या परिसरासाठी निधी खर्च केला. नागरिकांना फिरण्यासाठी ट्रॅक तयार करून ट्रॅकच्या दुतर्फा आकर्षक पद्धतीने झाडे लावण्यात आली. विशेष म्हणजे अनेक वृक्षप्रेमी नागरिकांनी देखील तेथील वृक्षांची काळजीपूर्वक जोपासना केली आहे. यमाई तलावावर वर्षभर अनेक प्रकारचे पक्षी वास्तव्यास असतात. त्यामुळे यमाई तलाव परिसर पक्षी निरीक्षकांसाठी देखील आकर्षण ठरत आहे. यंदा पाऊस जास्त झाल्यामुळे तलावातील पाण्याची पातळी वाढली असून, हा सारा परिसर अधिकच बहरला आहे. दररोज सकाळी आणि संध्याकाळी शेकडो पंढरपूरकर नागरिक या ठिकाणी फिरायला येतात आणि निसर्गाचा आनंद घेतात.
पर्यटकांसाठी पर्वणी तुळशी वृंदावन
श्री विठ्ठलाला तुळशी आवडतात, हे लक्षात घेऊन मागील राज्य शासनाच्या काळात श्री विठ्ठलाचे भक्त असलेले तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कल्पनेतून यमाई तलावाच्या काठी तुळशी वृंदावन उद्यानाची उभारणी करण्यात आली. वन विभागाच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या या उद्यानात सुमारे 50 फूट उंचीच्या श्री विठ्ठलाच्या मूर्तीची उभारणी करण्यात आली आहे. त्याशिवाय विविध संतांच्या मूर्ती असलेल्या कुट्या उभारण्यात आल्या असून विविध संतांची रेखाचित्रे आणि त्यांच्याविषयीची माहिती तिथे देण्यात आली आहे. आकर्षक कारंजे, विद्युत रोषणाई, अनेक प्रकारच्या तुळशी तसेच आकर्षक फुलांच्या झाडांमुळे हा परिसर मनमोहक झाला आहे. तुळशी वृंदावन पर्यटकांच्या दृष्टीने परवणी ठरत आहे. या ठिकाणी दररोज पंढरपूरकरांशिवाय परगावाहून येणारे पर्यटक भाविक देखील आवर्जून भेट देऊ लागले आहेत.
तालुक्यात पंढरपूर - मोहोळ रस्त्यावर पंढरपूरपासून सुमारे 11 किलोमीटर अंतरावर नारायण चिंचोली हे गाव आहे. तेथील प्राचीन श्री सूर्यनारायण मंदिर प्रसिद्ध आहे. मंदिरातील देखणी मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे.
तालुक्यात सातारा रस्त्यावर पंढरपूरपासून सुमारे 22 किलोमीटर अंतरावर असलेले भाळवणी गावातील श्री शाकंबरी मंदिरही आवर्जून पाहण्यासारखे आहे.
पंढरपूरला कमी वेळात पोचणार
पंढरपूर ते सातारा, पंढरपूर-मंगळवेढा मार्गे विजयपूर, पंढरपूर- टेंभुर्णी मार्गे नगर, पंढरपूर-सांगोला मार्गे कोल्हापूर यासह पंढरपूरकडे येणाऱ्या सर्वच रस्त्यांची कामे वेगात सुरू आहेत. त्यामुळे पूर्वीपेक्षा आता पंढरपूरला कमी वेळात पोचणे शक्य होणार आहे. रेल्वेने देखील कुर्डुवाडी आणि मिरज येथून पंढरपूरला येता येते.
बाजार आमटी तालुक्यात लोकप्रिय
पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील बाजार आमटी लोकप्रिय झाली आहे. पूर्वी केवळ करकंबमध्ये मिळणारी ही आमटी आता पंढरपूर शहरातील काही हॉटेल तसेच शहराजवळच्या ढाब्यांवर देखील मिळू लागली आहे.
प्रशिक्षित गाईडची गरज
शहरात आणि तालुक्यात अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. हजारो पर्यटक या ठिकाणी येतात. परंतु, या पर्यटकांना नेमकी माहिती देणारे प्रशिक्षित गाईड येथे नाहीत. त्यामुळे काही तरुणांना प्रशिक्षण दिल्यास आगामी काळात गाईड व्यवसायाला पंढरपुरात मागणी राहणार आहे.
संपादन : श्रीनिवास दुध्याल