अखेर पिलीव घाटातील दरोडेखोरांच्या आवळल्या पोलिसांनी मुसक्‍या ! दगडफेक करत बस लुटण्याचा केला होता प्रयत्न 

शुभजित नष्टे 
Monday, 25 January 2021

19 जानेवारी रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास म्हसवड बस स्थानक येथे आणली. त्या वेळी बसमधील सर्व प्रवासी म्हसवड स्थानकामध्ये व त्याअगोदरच उतरले होते. त्यानंतर एसटी पिलीव मार्गे सोलापूरकडे निघाली असताना एसटी रात्री साडेदहाच्या सुमारास सुळेवाडी, पिलीव घाटामध्ये आली. या वेळी घाटामध्ये अज्ञात 20 ते 22 वर्षे वय असलेल्या चारजणांनी एसटी बसवर बस लुटण्याच्या उद्देशाने दगडफेक करून बसच्या समोरील काचा फोडल्या व फिर्यादीस जखमी करून बस लुटण्याचा प्रयत्न केला.

पिलीव (सोलापूर) : सुलेवाडी (पिलीव) घाटात मंगळवारी (ता. 19) रात्री एसटी महामंडळाच्या बसवर दगडफेक करत बस लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या दरोडेखोरांना पोलिसांनी आज (सोमवारी) मोठ्या शिताफीने अटक केली आहे. 

सुलेवाडी (पिलीव) घाटात दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणारी टोळी पोलिसांनी जलद गतीने पकडली आहे. यातील फिर्यादी जिवराज सुभाष कदम (वय 44, एसटी चालक, रा. पांढरवाडी, पो. विसापूर, ता. खटाव, जि. सातारा) हे कोरेगाव बसस्थानक येथून सातारा ते सोलापूर अशी एमएच 06 एच 8971 ही कोरेगाव आगाराची बस घेऊन जात होते. ही बस यातील चालक व वाहक यांनी 19 जानेवारी रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास म्हसवड बस स्थानक येथे आणली. त्या वेळी बसमधील सर्व प्रवासी म्हसवड स्थानकामध्ये व त्याअगोदरच उतरले होते. त्यानंतर एसटी पिलीव मार्गे सोलापूरकडे निघाली असताना एसटी रात्री साडेदहाच्या सुमारास सुळेवाडी, पिलीव घाटामध्ये आली. या वेळी घाटामध्ये अज्ञात 20 ते 22 वर्षे वय असलेल्या चारजणांनी एसटी बसवर बस लुटण्याच्या उद्देशाने दगडफेक करून बसच्या समोरील काचा फोडल्या व फिर्यादीस जखमी करून बस लुटण्याचा प्रयत्न केला. बसचे अंदाजे 20 हजार रुपयांचे नुकसान केले. तसेच तेथून जाणाऱ्या दुचाकीस्वारास लुटण्याच्या उद्देशाने दगड मारून जखमी केले. 

याबाबत फिर्याद दाखल झाल्याने माळशिरस पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल झाला होता. याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक शशिकांत शेळके हे करीत आहेत. हा गुन्हा घडल्यापासून यातील आरोपी हे पोलिसांना चकवा देत होते. गुन्ह्याचा तपास करण्यासाठी आटपाडी, म्हसवड, नातेपुते, वेळापूर, पंढरपूर या सर्व पोलिस ठाणे हद्दीतील अनेक गावांमध्ये गोपनीय माहिती संकलित केल्यानंतर खबऱ्यामार्फत माहिती मिळाली, की हा गुन्हा देवापूर ता. माण, जि. सातारा व आटपाडी, जि. सांगली येथील संशयित आरोपींनी संयुक्तपणे केला आहे. माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची गती वाढवून यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक शेळके यांच्या तपास पथकाने म्हसवड पोलिस ठाणे हद्दीतील म्हसवड, हिंगणी, धुळदेव, देवापूर, पळसावडे या भागातील रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक केले. तसेच राजेवाडी, हिंगणी, देवापूर परिसरातील सर्व वीटभट्ट्यांवर वेषांतर करून तेथील कामगार व परिसरातील ऊसतोड कामगारांकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने गोपनीय माहिती मिळवली. त्यानंतर आटपाडी तालुक्‍यातील राजेवाडी तलावाच्या परिसरात मासे खरेदी व्यापारी असल्याचे भासवून देवापूर, जि. माण व राजेवाडी, जि. सांगली येथे सापळा लावला व आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. 

या गुन्ह्यात एकूण आठ आरोपी निष्पन्न झाले असून त्यापैकी पाच आरोपींना ताब्यात घेतले असून त्यापैकी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे व विधी संघर्षित बालक असल्यामुळे त्यांच्याबाबत ज्युवेनाईल जस्टिस ऍक्‍टप्रमाणे कार्यवाही केली जात आहे. सदर आरोपींकडून सांगली, सातारा जिल्ह्यातील मोटारसायकल चोरी, घरफोडी यांसारख्या गुन्ह्यांची उकल होण्याची शक्‍यता आहे. ही कामगिरी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी (अकलूज विभाग) नीरज राजगुरू, पोलिस निरीक्षक (माळशिरस) दीपरत्न गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक शशिकांत शेळके, पोलिस हेड कॉन्स्टेबल पंडित मिसाळ, पोलिस कॉन्स्टेबल दत्ता खरात, पोलिस कॉन्स्टेबल समाधान शेंडगे, पोलिस कॉन्स्टेबल सोमनाथ माने, पोलिस कॉन्स्टेबल सतीश धुमाळ, पोलिस कॉन्स्टेबल अन्वर आतार (सायबर) यांनी केली आहे. 

पिलीव घाटातील बस दरोडेखोरांची ही घटना पूर्ण महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात पसरली गेली होती आणि तीच घटना माझ्या परिक्षेत्रातील असल्याने त्यांचा तपास करणे हेच माझ्यापुढे उद्दिष्ट होते. ते आज मी आणि माझ्या टीमने पूर्ण केले आहे त्याचा अभिमान वाटतो. हे सराईत गुन्हेगार असल्याने त्यांच्याकडून कसून माहिती घेऊन दुसरी काही माहिती मिळते का याचा तपास सुरू आहे. 
- शशिकांत शेळके, 
सहाय्यक पोलिस निरीक्षक, पिलीव 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police arrested those who tried to rob an ST bus in Piliv Ghat