पोलिसांनी शोधले साडेआठ लाखांचे मोबाईल; आर्थिक फसवणूक झालेल्यांना परत मिळाली साडेपाच लाखांची रक्‍कम 

तात्या लांडगे 
Saturday, 12 September 2020

शहरातून चोरीला गेलेल्या मोबाईलचा शोध घेऊन पोलिसांनी 50 व्यक्‍तींचे मोबाईल शुक्रवारी (ता. 11) परत दिले. या प्रकरणी सायबर क्राईमने मोठी कामगिरी केली आहे. पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे, उपायुक्‍त बापू बांगर, डॉ. वैशाली कडूकर, सहायक पोलिस आयुक्‍त अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. 

सोलापूर : शहरातील नागरिकांचे जानेवारी 2019 ते 10 सप्टेंबर 2020 या काळात चोरीला गेलेल्या 50 मोबाईलचा शोध घेण्यात शहर पोलिसांना यश मिळाले आहे. दुसरीकडे पोलिसांनी मोबाईलच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक झालेल्यांची साडेपाच लाखांची रक्‍कमही परत मिळवून दिली आहे. 

शहरातून चोरीला गेलेल्या मोबाईलचा शोध घेऊन पोलिसांनी 50 व्यक्‍तींचे मोबाईल शुक्रवारी (ता. 11) परत दिले. या प्रकरणी सायबर क्राईमने मोठी कामगिरी केली आहे. पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे, उपायुक्‍त बापू बांगर, डॉ. वैशाली कडूकर, सहायक पोलिस आयुक्‍त अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. विविध कंपन्यांचे आठ लाख 48 हजार 145 रुपयांचे मोबाईल आणि आर्थिक फसवणूक झालेल्या 31 जणांना पाच लाख 50 हजार 570 रुपयांची रक्‍कम परत देण्यात आली. गूगल पे, फोन पे, पेटीएम, डेबिट व क्रेडिट कार्डद्वारे फसवणूक झालेल्यांचाही त्यामध्ये समावेश आहे. कर्नाटकसह अन्य राज्यांमधून व जिल्ह्यांमधून पोलिसांनी मोबाईल हस्तगत केले आहेत. सायबर क्राईमचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरुण फुगे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पथकाने ही मोठी कामगिरी पार पाडली. 

याबाबत सहाय्यक पोलिस आयुक्त अभय डोंगरे म्हणाले, नागरिकांनी कोणत्याही आमिषेला बळी पडू नये. फसवणारी व्यक्‍ती संबंधिताला कशाचेही आमिष दाखवून समोरच्याचे बॅंक डिटेल्स मिळविते. त्यातून ऑनलाइन फसवणुकीचे प्रमाण वाढत असून कोणतीही बॅंक त्यांच्या खातेदारांना मोबाईलवरून माहिती मागत नाही. फसवणूक झाल्यास संबंधितांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police found eight and a half lakh stolen mobiles