
ज्यांच्यावर दोन व दोनपेक्षा ज्यादा विविध गुन्हे दाखल आहेत अशा 72 जणांचे तडिपारीचे प्रस्ताव वरिष्ठांकडे मंजुरीसाठी पाठवले आहेत. प्राथमिक स्वरूपातील प्रतिबंधक कारवाईच्या पार्श्वभूमीवर 770 जणांना नोटिसा दिल्या आहेत. अवैध दारू विकणाऱ्या 50 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत, तसेच चांगल्या वर्तणुकीचे 300 जणांकडून तहसीलदारांमार्फत बॉंड लिहून घेतले आहेत.
मोहोळ (सोलापूर) : मोहोळ तालुक्यातील ग्रामपंचायती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय दंड विधानाच्या विविध कलमान्वये एकूण बाराशे जणांवर कारवाई करण्यात आली असून, मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी साठ गावांना भेटी देऊन नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले आहे. दरम्यान, 72 जणांचे तडिपारीचे प्रस्ताव मंजुरीसाठी वरिष्ठांकडे पाठवले असून, त्यात अनेक बड्या धेंडांचा समावेश आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक अशोक सायकर यांनी दिली.
मोहोळ तालुक्यातील 63 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू आहे. विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती यापेक्षाही गाव पातळीवरील या निवडणुका असल्याने या निवडणुकांना मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. एकूण 76 ग्रामपंचायतींपैकी 13 ग्रामपंचायती यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी 1189 जणांवर विविध कलमान्वये कारवाई करण्यात आली, तर गाव पातळीवर गोंधळ घालणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर आहे.
ज्यांच्यावर दोन व दोनपेक्षा ज्यादा विविध गुन्हे दाखल आहेत अशा 72 जणांचे तडिपारीचे प्रस्ताव वरिष्ठांकडे मंजुरीसाठी पाठवले आहेत. प्राथमिक स्वरूपातील प्रतिबंधक कारवाईच्या पार्श्वभूमीवर 770 जणांना नोटिसा दिल्या आहेत. अवैध दारू विकणाऱ्या 50 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत, तसेच चांगल्या वर्तणुकीचे 300 जणांकडून तहसीलदारांमार्फत बॉंड लिहून घेतले आहेत. जुगार व बेकायदा वाळू वाहतूक करणाऱ्या पाच जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. तालुक्यातील एकूण 11 गावे संवेदनशील आहेत, त्यांच्यावर मागील अनुभव पाहता पोलिसांची करडी नजर असणार आहे. तर त्या ठिकाणी फिरते पोलिस पथक गस्त घालणार आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने एकूण 50 शस्त्रे जमा करण्यात आली असून, गावोगावच्या पोलिस पाटलांच्या बैठका घेऊन त्यांना सतर्क करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक अशोक सायकर यांनी दिली.
संपादन : श्रीनिवास दुध्याल