पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांच्याभोवती घोंगावतोय करमाळ्यातील राजकीय वादळ ! 

आण्णा काळे 
Tuesday, 10 November 2020

करमाळा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळे हे तालुक्‍यात अवैध धंद्यांना पाठीशी घालत असून, खोटे गुन्हे दाखल होत आहेत. याविरोधात भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी उपोषण सुरू केलेले असताना, पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांच्या समर्थनार्थ सर्वपक्षीय कार्यकर्ते चक्री उपोषण करण्यासाठी सरसावले आहेत. मात्र या उपोषणाला प्रशासनाने परवानगी नाकारली असल्याचे कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सुनील सावंत यांनी सांगितले. 

करमाळा (सोलापूर) : करमाळा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळे हे तालुक्‍यात अवैध धंद्यांना पाठीशी घालत असून, खोटे गुन्हे दाखल होत आहेत. याविरोधात भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी उपोषण सुरू केलेले असताना, पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांच्या समर्थनार्थ सर्वपक्षीय कार्यकर्ते चक्री उपोषण करण्यासाठी सरसावले आहेत. मात्र या उपोषणाला प्रशासनाने परवानगी नाकारली असल्याचे कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सुनील सावंत यांनी सांगितले. 

दुसरीकडे, शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील, करमाळा पंचायत समितीचे सभापती गहिनीनाथ ननवरे, गणेश चिवटे, अतुल खुपसे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी चिवटे यांच्या उपोषणाला पाठिंबा देत श्रीकांत पाडुळे यांची खातेनिहाय चौकशी करून बदलीची मागणी केली आहे. 

6 नोव्हेंबर 2020 पासून भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे, वंदे मातरम संघटनेचे सुहास घोलप यांनी करमाळा तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. मंगळवारी (ता. 10) उपोषणाचा पाचवा दिवस आहे. चिवटे यांच्या उपोषणास भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला आहे. 

श्रीकांत पाडुळे यांच्या समर्थनार्थ दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांचे काम चांगले असून, पाडुळे यांनी तालुक्‍यात अवैध धंद्यांना आळा घातला आहे. सर्वसामान्य नागरिक, महिला यांना न्याय देत आहेत. त्यांच्या काळात गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण कमी झाले असून गुन्हेगारीला आळा बसला आहे. श्री. पाडुळे यांच्या धोरणामुळे ज्यांचे अवैध धंदे बंद झाले आहेत तेच लोक पाडुळे यांच्यावर खोटे आरोप करत उपोषणास बसले आहेत. त्यामुळे करमाळा पोलिस स्टेशनच्या सुरू असलेल्या चांगल्या कामाला पाठिंबा देण्यासाठी व श्री. पाडुळे यांच्या समर्थनार्थ ता. 10 नोव्हेंबरपासून चक्री उपोषणाला बसण्याचे निवेदन दिले, मात्र उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल हिरे यांनी याविषयी बैठक घेऊन मार्ग काढण्यात येईल, असे सांगितले असल्याचे सुनील सावंत यांनी सांगितले. त्यामुळे हे चक्री उपोषण होऊ शकले नाही. 

या निवेदनावर कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष दादासाहेब लबडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष वारे, जिल्हा परिषद सदस्या राणी वारे, आरपीआयचे नागेश कांबळे, शिवसेना तालुकाप्रमुख सुधाकर लावंड, सुनील सावंत, संजय एन. जगताप, प्रशांत ढाळे, अतुल फंड, महादेव फंड, चंद्रकांत राखुंडे, लीलावती कांबळे, अल्ताफ तांबोळी यांच्या सह्या आहेत. 

तर माजी आमदार नारायण पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की गणेश चिवटे यांनी करमाळा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांच्या विरोधात सुरू केलेल्या उपोषणास जाहीर पाठिंबा देण्यात येत असून, तालुक्‍यातील अवैध धंदे सुरू करण्यास पोलिस निरीक्षक पाडुळे हे खतपाणी घालत आहेत. याशिवाय ते सर्वसामान्य नागरिकांना धमकीची भाषा वापरतात, अनेकांवर खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देतात. अवैध धंद्यात पाडुळे यांचे आर्थिक हितसंबंध गुंतले आहेत. त्यामुळे त्यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Political parties are agitating against and in support of Police Inspector Padule