Gram Panchayat Results : हालहळ्ळीत 25 वर्षांनंतर सत्तांतर ! सत्तेच्या सोपानावरील स्वामी गट पायउतार 

Halhalli.
Halhalli.

सोलापूर : अक्‍कलकोट तालुक्‍यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या हालहळ्ळी ग्रामपंचायतीत 25 वर्षांनंतर यंदा सत्तांतर झाले असून, 25 वर्षे सत्तेच्या सोपानावर आरूढ होऊन गावकऱ्यांना सेवा न दिलेल्या ग्रामसेवक श्रीशैल स्वामी गटाला मतदारांनी पायउतार होण्यास लावले आहे. यंदा युवकांना मतदारांनी पसंती दिली असून, पहिल्यांदा सुतार पती-पत्नीने विजयाचा जल्लोष करीत ग्रामसंसद असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये एंट्री केली आहे. सिद्धाराम सुतार व विजयालक्ष्मी सुतार या पती-पत्नीने जनमताचा कौल मिळवत ग्रामपंचायतीवर विजय संपादन केला आहे. 

सात सदस्य असलेल्या हालहळ्ळी (अ) ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत व्हसुरे, बिराजदार, रसनभैरे, पाटील पॅनेलने स्वामी गटासमोर कडवे आव्हान उभे केले होते. गत 25 वर्षांमध्ये शून्य सदस्य संख्येवर तीन आकडा गाठत यंदा सातही जागांवर विजय संपादन केले. यासाठी युवकांची मोट बांधल्याने यश खेचून आणणे शक्‍य झाल्याचे पॅनेल प्रमुख उद्योगपती रमेश व्हसुरे, हणमंत बिराजदार, राहुल रसनभैरे यांनी सांगितले. 

सुरवातीला ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा प्रयत्न झाला. गावातील अशिक्षितांना पुढे करून मतदारांना भुरळ घालण्याचा प्रयत्न झाला. मात्र विरोधी गटाचे हणमंत बिराजदार, राहुल रसनभैरे आणि रमेश व्हसुरे यांनी पुढाकार घेत निवडणूक लावण्यास भाग पाडले. या प्रक्रियेत विरोधक स्वामी गटाला अनुसूचित जाती गटातील उमेदवार न मिळाल्याने एक जागा बिनविरोध झाली. प्रत्यक्षात निवडणुकीत सहाही जागा युवकांच्या महाविकास आघाडीला मिळाल्या. विजयकुमार ऊर्फ प्रकाश बिराजदार, महादेवी धनशेट्टी, सिद्धाराम सुतार, विजयालक्षी सुतार, रेखा बिराजदार, शंकर जमादार हे उमेदवार निवडून आले आहेत, तर रत्नाबाई नंदकुमार वाघमारे या बिनविरोध झाल्या आहेत. निवडणूक लागल्यानंतर अनेक राजकीय घटना - घडामोडी घडल्या. त्यानंतर वळदड्डे, कळमंडे, जमादार या गटाने युवकांच्या महाविकास आघाडीला पाठिंबा दिला. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com