आता वाजणार बार्शी तालुक्‍यातील 96 ग्रामपंचायतींचा बिगुल ! कोरोनामुळे रखडल्या होत्या निवडणुका 

grampanchayat
grampanchayat

वैराग (सोलापूर) : बार्शी तालुक्‍यात मुदत संपलेल्या 96 ग्रामपंचायतींचा बिगुल लवकरच वाजणार असून, प्रभाग रचना, आरक्षण, मतदार याद्या अद्ययावत करणे, आरक्षण सोडत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे जुलै 2020 पासून मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने पुढे ढकलल्या होत्या. परंतु सध्याच्या ग्रामपंचायत निवडणुका कोरोना बचाव मार्गदर्शक तत्त्वानुसार होण्याची शक्‍यता आहे. निवडणूक आयोगाने या निवडणुका घेण्यासंबंधी हालचाली सुरू केल्या आहेत. 
जिल्ह्यात सर्वांत जास्त बार्शी तालुक्‍यातील तब्बल 96 ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्यासंदर्भात प्रभाग रचना आणि आरक्षण अहवाल तयार करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या असून, प्रशासन कामाला लागल्याने डिसेंबर ते जानेवारी महिन्यात या निवडणुका होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. त्यामुळे लवकरच ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी उडणार आहे. 

जुलै 2020 पासून मुदत संपली तरी निवडणूक आयोगाने निवडणुका तहकूब करून पुढे ढकलल्या होत्या. प्रशासक नियुक्त करून कामकाज सुरू ठेवले असले तरीही अपेक्षित काम होत नाही. या वेळी कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागल्याने निवडणूक प्रशासनाने जुलै ते डिसेंबर 2020 अखेर मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्यासाठी प्रभाग रचना आणि आरक्षण अहवालास अंतिम मंजुरीबाबत 31 ऑक्‍टोबर अखेर जिल्हाधिकाऱ्यांना आदेश जारी केला आहे. 

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी प्रभाग रचना व आरक्षण सोडतीचा अहवाल उपजिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करून जिल्हाधिकाऱ्यांकडून अंतिम मंजुरी देण्यात येणार आहे. या प्रकियेसाठी 27 ऑक्‍टोबर ही मुदत जाहीर करण्यात आली होती. तर जिल्हाधिकारी यांनी त्यास 2 नोव्हेंबर रोजी व्यापक प्रसिद्धी द्यावी, अशी सूचना केली आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कोणत्याही क्षणी निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्‍यता आहे. डिसेंबर 2020 ते जानेवारी 2021 च्या दरम्यान ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा उडण्याची शक्‍यता आहे. बार्शी तालुक्‍यात 96 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे आताच गावोगावी गाव पुढाऱ्यांना निवडणुकीचा फिव्हर चढायला सुरवात होऊ लागली आहे. 

वैरागबाबतच्या निर्णयाकडे लक्ष 
31 ऑक्‍टोबरअखेर मुदत संपत आलेल्या ग्रामपंचायतींसाठी 2 नोव्हेंबर रोजी बैठक होणार आहे. वैराग ग्रामपंचायतीची स्थापना 8 ऑगस्ट 1936 मध्ये झाली आहे. ग्रामपंचायत लोकसंख्या व मतदार संख्या पाहता वैराग ग्रामपंचायत ही सोलापूर जिल्ह्यातील मोठी ग्रामपंचायत मानली जाते. वैराग ग्रामपंचायतचे नगर पंचायतीमध्ये रूपांतर करावे, याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे दाखल केलेला आहे. त्यामुळे पुढील होणारे मतदान ग्रामपंचायतीचे होणार की नगर पंचायतीचे? याकडे वैरागकरांचे लक्ष लागले आहे. वैराग ग्रामपंचायतीसाठी आता विविध गटातटांची मोर्चेबांधणी सुरू झाल्याचे चित्र दिसू लागले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com