जिल्ह्यातील 12 डिस्टिलरीजमध्ये 14.21 लाख लिटर सॅनिटायझरचे उत्पादन ! आता मात्र निर्मितीत खंड 

सकाळ वृत्तसेवा 
Friday, 4 December 2020

जिल्ह्यातील 12 डिस्टिलरीज कंपन्यांनी अल्कोहोल मिश्रित सॅनिटायझरचे उत्पादन केले असून, कोरोना महामारीच्या कालावधीत श्रीपूर येथील ब्रिमा शुगर महाराष्ट्र डिस्टिलरीने सर्वात जास्त सॅनिटायझरची विक्री केली आहे. साखर कारखान्यांनी 14 लाख 21 हजार लिटर अल्कोहोल मिश्रित सॅनिटायझरची निर्मिती केली, तर त्यापैकी 13 लाख 54 हजार लिटर सॅनिटायझरची विक्री केली. 

सोलापूर : जिल्ह्यातील 12 डिस्टिलरीज कंपन्यांनी अल्कोहोल मिश्रित सॅनिटायझरचे उत्पादन केले असून, कोरोना महामारीच्या कालावधीत श्रीपूर येथील ब्रिमा शुगर महाराष्ट्र डिस्टिलरीने सर्वात जास्त सॅनिटायझरची विक्री केली आहे. साखर कारखान्यांनी 14 लाख 21 हजार लिटर अल्कोहोल मिश्रित सॅनिटायझरची निर्मिती केली, तर त्यापैकी 13 लाख 54 हजार लिटर सॅनिटायझरची विक्री केली. आता सध्या बाजारामध्ये अनेक प्रकारचे सॅनिटायझर मिळू लागल्याने या कारखान्यांनी सॅनिटायझरचे उत्पादन कमी केले. काही कारखान्यांनी तर ते बंद देखील केले आहे. 

कोरोना महामारीच्या कालावधीत ज्या वेळी संपूर्ण देशात कडक लॉकडाउनची अंमलबजावणी सुरू होती, त्या वेळी कोरोनाचा विषाणू हा अल्कोहोल मिश्रित सॅनिटायझरने जास्त प्रमाणात प्रतिबंधित होत असल्याने राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी अल्कोहोल मिश्रित सॅनिटायझरची निर्मिती करण्यास सुरवात केली. सोलापूर जिल्ह्यातील 12 साखर कारखान्यांनी देखील सॅनिटायझरची निर्मिती करण्यासाठी शासनाच्या अन्न व औषध प्रशासनाकडून परवानगी घेऊन उत्पादन सुरू केले. अल्कोहोल मिश्रित सॅनिटायझर तयार करण्यासाठी साखर कारखान्यांना आरएस 2 युनिट म्हणून अन्न व औषध प्रशासन तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून परवाना देण्यात आला. अल्कोहोल मिश्रित सॅनिटायझर तयार करण्यासाठीचा मूळ परवाना हा अन्न व औषध प्रशासनाचा असून, उत्पादनासाठी लागणाऱ्या स्पिरीटवर मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे नियत्रंण आहे. 

जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी 2 डिसेंबर अखेरपर्यंत वापरलेले स्पिरीट, निर्मित केलेले अल्कोहोल, विक्री केलेले आणि शिल्लक राहिलेले अल्कोहोल मिश्रित सॅनिटायझर : (कंसात आकडेवारी लिटरमध्ये) : 

 • ब्रिमा शुगर (स्पिरीट 1,30,983, सॅनिटायझर 1,61,037, विक्री 1,50,713, शिल्लक 10,323) 
 • विष्णू-लक्ष्मी को ग्रेप डिस्टलरी (स्पिरीट 71,000, सॅनिटायझर 88,564, विक्री 78,914, शिल्लक 9,650) 
 • विठ्ठल कार्पोरेशन, म्हैसगाव (स्पिरीट 54,836, सॅनिटायझर 65,808, विक्री 65,808, शिल्लक 0) 
 • विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना (स्पिरीट 25,030, सॅनिटायझर 30,000, विक्री 28,345, शिल्लक 1654) 
 • लोकमंगल ऍग्रो इंडस्ट्रिज (स्पिरीट 1,18,953, सॅनिटायझर 1,42,552, विक्री 1,38,624, शिल्लक 3,928) 
 • फॅबटेक शुगर (स्पिरीट 23,980, सॅनिटायझर 28,777, विक्री 21,892, शिल्लक 6,885) 
 • युटोपियन शुगर (स्पिरीट 53,762, सॅनिटायझर 64,518, विक्री 56,212,, शिल्लक 8,300) 
 • जकराया शुगर (स्पिरीट 4,46,879, सॅनिटायझर 5,26,031, विक्री 5,14,621, शिल्लक 11,409 ) 
 • श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना (स्पिरीट 52,490, सॅनिटायझर 63,000, विक्री 61,616, शिल्लक 1,383) 
 • खंडोबा डिस्टलरीज (स्पिरीट 1,10,838, सॅनिटायझर 1,32,000, विक्री 1,22,970, शिल्लक 9,019) 
 • सिद्धेश्‍वर सहकारी साखर कारखाना (स्पिरीट 89,000, सॅनिटायझर 1,05,803, विक्री 1,02,651, शिल्लक 3,151) 
 • सासवड माळी साखर कारखाना (स्पिरीट 11,112, सॅनिटायझर 13,342, विक्री 12,123, शिल्लक 1,218) 

सॅनिटायझरमध्ये 80 टक्‍के अल्कोहोल 
मद्य तयार करण्यासाठी 40 टक्‍के अल्कोहोल वापरण्यात येते. पंरतु, अल्कोहोल मिश्रित सॅनिटायझरमध्ये अल्कोहोलचे प्रमाण हे 80 टक्‍के असते. त्यामुळे या सॅनिटायझरचा वास उग्र येतो. 

अल्कोहोल मिश्रित सॅनिटायझरची निर्मिती करण्यासाठी डिस्टलरींकडे असणाऱ्या स्पिरीटवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे नियत्रंण असून, सॅनिटायझरच्या विक्रीवर अन्न व औषध प्रशासनाचे नियत्रंण आहे. गेल्या काही दिवसांपासून डिस्टलरींनी सॅनिटायझर निर्मिती करणे बंद केले असून, यापूर्वी त्यांनी तयार केलेले सॅनिटायझर विक्री करण्यात येत आहे. 
- रवींद्र आवळे, 
अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, सोलापूर 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Production of sanitizers in distilleries in Solapur district has now declined