मराठीत शिक्षण घेणे महाराष्ट्रात गुन्हा आहे काय? कोणी केला सवाल? वाचा 

Protest
Protest

सांगोला (सोलापूर) : दहावीपर्यंत फक्त मराठीत शिक्षण झाल्यामुळे मुंबई महापालिकेमध्ये पवित्र पोर्टलद्वारे मेरिटनुसार निवड झालेल्या तसेच कागदपत्रांची पडताळणी होऊनही अद्याप नियुक्ती न मिळालेल्या भावी शिक्षकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरी बसून वेगळेच आंदोलन सुरू केले आहे. नियुक्‍त्या न मिळालेल्या या भावी शिक्षकांनी घरी बसूनच सोशल मीडियाचा वापर करीत शिक्षण आयुक्त, महापालिकेचे महापौर, शिक्षणमंत्री, संबंधित शिक्षण विभागाचे अधिकारी व नेतेमंडळींना ट्विटबरोबरच मेल, व्हॉट्‌सऍप मेसेज करत आहेत. महाराष्ट्रात मराठीत शिक्षण घेणे आमचा गुन्हा आहे काय, असा संतप्त सवाल हे भावी शिक्षक विचारत आहेत. 

मुंबई महापालिकेच्या शाळांसाठी ऑगस्ट महिन्यात पवित्र पोर्टलद्वारे निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. यामधील सध्या प्राथमिकच्या 150 विद्यार्थ्यांना अद्यापही नियुक्ती मिळाली नाही. या विद्यार्थ्यांचे अकरावी, बारावी व डीएड इंग्रजी माध्यमातून झाले असले तरीसुद्धा दहावीपर्यंत शिक्षण मराठी माध्यमातून झाल्याने त्यांना नियुक्तिपत्र देण्यात आले नसल्याचे सांगण्यात येत आहे. एकीकडे शासन मातृभाषेच्या शिक्षणाची सक्ती करत असताना, फक्त दहावीपर्यंत मराठी माध्यमातून शिक्षण घेतल्याने अनेक विद्यार्थ्यांना पवित्र पोर्टलच्या गुणवत्तेनुसार निवड होऊनही अद्यापही नियुक्तिपत्र मिळत नाही. या विद्यार्थ्यांची कागदपत्रांची पडताळणी झाली असून जवळजवळ एक वर्ष झाले हे विद्यार्थी मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. याबाबत विद्यार्थ्यांनी शिक्षण आयुक्त, महापौर यांची भेट घेतली असूनही या भावी शिक्षकांना अद्याप नियुक्ती मिळाली नाही. हे भावी शिक्षक सध्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सोशल मीडियाद्वारे एकत्रितरीत्या संबंधित अधिकारी, शिक्षण आयुक्त, महापौर, शिक्षणमंत्री यांना याबाबत सतत प्रश्‍न विचारत असून ट्‌विटर वॉरबरोबरच मेल, व्हॉट्‌सऍप, टेलिग्राम अशा माध्यमातून आपले प्रश्‍न ते मांडत आहेत. कोरोनामुळे एकत्र येऊन आंदोलन करता येत नसल्याने हे भावी शिक्षक सध्या घरातूनच सोशल मीडियाद्वारे आंदोलन करीत आहेत. 

घर बैठे डिग्री जलाओ आंदोलन 
डीटीएड, बीएड स्टुडंट असोसिएशनच्या वतीने राज्यव्यापी हे आंदोलन 10 जुलै रोजी सकाळी 10 वाजता करण्यात येणार आहे. संघटनेच्या वतीने आंदोलनात सहभागी विद्यार्थी हे डिग्री सर्टिफिकेटच्या साक्षांकित प्रती जाळून राज्यव्यापी घर बैठे डिग्री जलाओ आंदोलन करणार आहेत. यामध्ये शिक्षक भरतीला विशेष परवानगी देऊन रिक्त जागा भराव्यात, शिक्षण सेवकांचे मानधन 24 हजार रुपये करावे तसेच मुंबई महापालिकेत निवडलेल्या विद्यार्थ्यांना लवकर नियुक्ती द्यावी, अशा मागण्या करण्यात येणार आहेत. 

याबाबत मुंबई महानगरपालिकेत निवड झालेले शिक्षक समाधान गिऱ्हे म्हणाले, गुणवत्तेनुसार पोर्टलद्वारे आमची निवड होऊनही फक्त दहावीपर्यंत मराठीत शिक्षण झाल्यामुळे आम्हाला अद्याप नियुक्ती मिळाली नाही. मराठीत शिक्षण घेणे हा महाराष्ट्रात गुन्हा आहे काय? 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com