छत्रपती संभाजी तलावातील गाळ साठवण्याचा प्रश्‍न : शेतकऱ्यांना गाळ देणे गरजेचे 

galkam.jpg
galkam.jpg

सोलापूरः शहरातील छत्रपती संभाजी महाराज तलावाच्या सुशोभिकरणाचे काम युध्दपातळीवर सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यात जलपर्णी वनस्पती काढल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्याचे गाळ काढण्याचे काम सुरू आहे. असे असले तरी, मागील महिनाभरात काढलेला गाळ शेतकऱ्यांना देण्याची सुविधा न केल्याने गाळ टाकण्यासाठी आता जागा अपुरी पडू लागली आहे. या प्रकारामुळे दररोजच्या गाळ काढण्याच्या कामाचा वेग मंदावला आहे. 

या कामासाठी दैनिक "सकाळ'ने सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याचा परिणाम म्हणून मागील काही महिन्यांपासून या कामास सुरुवात झाली आहे. हे काम दोन टप्यात होत आहे. पहिल्या टप्प्यात जलपर्णी वनस्पती काढण्यात आला. तलावाचे मध्य, उत्तर व दक्षिण असे तीन भाग असल्याने प्रत्येक भागात हे काम सुरु केले आहे. त्यासाठी जलपर्णी काढण्यासाठी बॅक वॉटर ड्रेजर काम करत आहे. तर गाळ काढण्यासाठी ड्रेजर काम करत आहे. या तलावातून काढलेली जलपर्णी ही वनस्पती वाळल्यानंतर पुढील प्रक्रियेसाठी पाठवली गेली आहे. 
तर सध्या दररोज निघणारा हा पाणीमिश्रीत गाळ हा तलावाच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत टाकण्यात येत आहे. तेथे स्थानिक लोक या गाळापासून विटा तयार करत आहेत. मात्र, आता ही जागा अपुरी पडत असल्याने आणखी जागेचा शोध सुरु आहे. पण जागा नसल्याने या यंत्रसामुग्रीची गाळ काढण्याची क्षमता जास्त असताना देखील कामाचा वेग मंदावला आहे. हा गाळ पाणी मिश्रीत असल्याने एका ठिकाणी तो टाकून त्यातील पाणी कमी झाल्यानंतर उरलेला गाळ उचलाव लागत आहे. हा गाळ शेतीसाठी सर्वाधिक सुपीक असतो. प्रत्यक्षात या कंत्राटदार कंपनीने इतर राज्यात गाळ काढण्याची कामे केली तेथे शेतकऱ्यांना गाळ देण्यात आला. त्यामुळे जागेचा प्रश्‍न आला नव्हता. शेतकऱ्यांसाठी कंत्राटदार कंपनी गाळ जेसीबीद्वारे उचलून शेतकऱ्यांच्या वाहनात टाकण्याची मदत करू शकते. मात्र, या कामात अद्याप गाळ शेतकऱ्यांना देण्याची सुविधा केली नाही. त्यामुळे ही अडचण निर्माण झाली आहे. या प्रकारामुळे कामाचा वेग अतिशय मंदावला आहे. हा जागेचा प्रश्‍न सोडवण्याची गरज निर्माण झाली आहे. 
विशेष म्हणजे, हे काम निविदा रकमेच्या तुलनेत कमी दराने केले जात आहे. त्यामुळे महानगरपालिकेला त्याचा आर्थिक लाभ झाला आहे. जलपर्णी काढण्याची निविदा सात टक्‍क्‍यांनी कमी घेतली गेली. तर गाळ काढण्याचे काम तेवीस टक्‍क्‍यांनी कमी दरात घेतले गेले आहे. 

ठळक बाबी 
- तलावातील एकूण अंदाजे गाळ ः 2.70 लाख क्‍युबिक मीटर 
-आतापर्यंत काढलेला गाळ ः 30 हजार क्‍युबिक मीटर 
- एकूण काढलेली जलपर्णी वनस्पती ः 8 हजार टन 
- शिल्लक गाळ ः 2 लाख 40 हजार क्‍युबिक मीटर 
- गाळ काढण्यासाठी वापरलेल्या मोकळ्या जागा ः दोन 


आगळा पॅटर्न 
या प्रकारचे काम राज्यातील गाळ काढण्याच्या कामातील हा महत्त्वाचा प्रयोग मानला जात आहे. सर्वसाधारणपणे तलावातील पाणी सुकल्यानंतर गाळ काढला जातो. पण यामध्ये विशेष प्रकारचे ड्रेझर वापरून तलावात पाणीसाठा कायम ठेवून गाळ काढला जातो. या प्रकारचे प्रयोग केरळ, कर्नाटक, ओरीसा आदी राज्यात केले गेले आहेत. त्यामुळे या तलावाचा पॅटर्न राज्यभरासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. 


"सकाळ'चा पाठपुरावा 
छत्रपती संभाजी तलावच्या सुशोभिकरणासाठी "सकाळ'कडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. सुरवातीपासून पर्यावरणवादी भूमिका घेत संभाजी तलावाच्या रुपाने शहराला लाभलेल्या या देगणीचे संवर्धन व्हावे, शहरातील पर्यटन विकाससाठी सतत पाठपुरावा करून या तलावाच्या संवर्धनासह सुशोभिकरणाचा प्रश्‍न "सकाळ' प्रशासनाकडे लावून धराला आहे. 

जलपर्णीपासून खतनिर्मिती 
जलपर्णी वनस्पती आम्ही कंपोस्टींग प्रक्रियेसाठी स्वीकारल्या आहेत. त्यावर कंपोस्टींग प्रक्रिया होण्यासाठी काही अवधी लागणार आहे. तसेच त्यातील काही भाग वीज निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालात वापरला आहे. 
- राजीव यादव, डेप्युटी मॅनेजर, सोलापूर बायो एनर्जी  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com