
राज्यात 14 हजार 223 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा रणसंग्राम सध्या जोरात सुरू आहे. त्यासाठी येत्या 15 जानेवारीला मतदान होत आहे. निवडणूक लागलेल्या गावात जोरदार रणधुमाळी सुरू आहे. यापैकी अनेक गावांतील तरुण सैन्यदल, सीआरपीएफ, बीएसएफ व अन्य लष्करी सेवेत परराज्यात सध्या कार्यरत आहेत. त्यापैकी अनेकांची कुटुंबे त्यांच्या समवेत आहेत.
माळीनगर (सोलापूर) : देशात ठिकठिकाणी देशसेवेचे कर्तव्य बजावत असलेल्या राज्यातील नागरिकांना त्यांच्या गावातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदान करण्याची संधी राज्य निवडणूक आयोग व प्रशासन कशाप्रकारे उपलब्ध करून देणार, असा प्रश्न निवडणुकीत उभे ठाकलेल्या त्यांच्या नातेवाइकांकडून उपस्थित केला जात आहे.
राज्यात 14 हजार 223 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा रणसंग्राम सध्या जोरात सुरू आहे. त्यासाठी येत्या 15 जानेवारीला मतदान होत आहे. निवडणूक लागलेल्या गावात जोरदार रणधुमाळी सुरू आहे. यापैकी अनेक गावांतील तरुण सैन्यदल, सीआरपीएफ, बीएसएफ व अन्य लष्करी सेवेत परराज्यात सध्या कार्यरत आहेत. त्यापैकी अनेकांची कुटुंबे त्यांच्या समवेत आहेत. मात्र, त्यांची नावे गावाकडील मतदार यादीत समाविष्ट आहेत. त्यापैकी काहींच्या कुटुंबातील आई, वडील, भाऊ, बहीण, भावजय व अन्य नातेवाईक निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. गावपातळीवर ही निवडणूक होत असल्याने ती नेहमीच प्रतिष्ठेचा व चर्चेचा विषय बनलेली असते.
ग्रामपंचायत निवडणुका कायमच चुरशीच्या होत असतात. ती जिंकण्यासाठी एक-एक मत महत्त्वाचे ठरते. उमेदवार एका मताने ग्रामपंचायत निवडणूक जिंकल्याची अथवा हरल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे नोकरी व कामधंद्यानिमित्त परगावी असलेल्या मतदारांना मतदानास येण्यासाठी उमेदवार गळ घालत असतात. एव्हाना त्यांच्या येण्या - जाण्याची खास व्यवस्था उमेदवार करतात. अशा मतदारांची वेगळीच बडदास्त उमेदवार ठेवतात.
निवडणुकीत दंड थोपटलेल्या कुटुंबातील सदस्यच देशसेवा व तत्सम सेवेत परराज्यात अथवा देशाच्या सीमेवर असल्यास त्यांचे व त्यांच्या कुटुंबास मतदानापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे. लोकशाहीत मतदान हा नागरिकांचा मूलभूत हक्क व अधिकार आहे. मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य मानले जाते. नागरिकांनी मतदान करण्यासाठी मोठी जनजागृती मोहीम राबवली जाते. मतदानापासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी निवडणूक आयोग व प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न केले जातात. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत देशसेवेतील कर्मचाऱ्यांना मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. लष्करी सेवेत असलेले नागरिक व त्यांच्या कुटुंबीयांना सध्याच्या ग्रामपंचायत निवडणुकीत मतदानाची व्यवस्था कशी असणार, त्यांना मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची संधी मिळणार का, असे प्रश्न निवडणूक आखाड्यात उतरलेल्या नातेवाइकांना पडले आहेत.
संपादन : श्रीनिवास दुध्याल