"सचिन, आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्विट करशील?' "स्वाभिमानी'च्या बागलांनी तेंडुलकरांच्या घरासमोर फलक धरून वेधले लक्ष 

अभय जोशी 
Monday, 8 February 2021

दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी ट्‌विट केले होते. त्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते रणजित बागल यांनी मुंबईत तेंडुलकर यांच्या घराबाहेर उभे राहून, "सचिन, आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्‌विट करशील?' असा मजकूर असलेला फलक घेऊन तेंडुलकर यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. 

पंढरपूर (सोलापूर) : दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी ट्‌विट केले होते. त्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते रणजित बागल यांनी मुंबईत तेंडुलकर यांच्या घराबाहेर उभे राहून, "सचिन, आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्‌विट करशील?' असा मजकूर असलेला फलक घेऊन तेंडुलकर यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते रणजित बागल हे पंढरपूर तालुक्‍यातील गादेगाव येथील आहेत. दिल्लीमधील शेतकरी आंदोलनाच्या संदर्भात भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी ट्‌विट केले होते. त्यानंतर आज (सोमवारी) रणजित बागल यांनी थेट मुंबईत सचिन तेंडुलकर यांच्या घराच्या बाहेर उभे राहून "सचिन, आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्‌विट करशील?' असा फलक घेऊन प्रश्न उपस्थित केला. भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी शेतकऱ्यांबद्दल ट्‌विट करावे आणि शेतकऱ्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करावी, अशी विनंती श्री. बागल यांनी या वेळी बोलताना केली. 

देशातील अन्नदाता शेतकरी संकटात असताना त्याला उभारी देण्यासाठी सचिनजी यांनी एक ट्‌विट करावे. धावांचा पाऊस पाडून सचिनजी यांनी जरी विश्वविक्रम केले असले तरी सचिनजी जसे भारतरत्न आहेत त्याच पद्धतीने या देशातील शेतकरी बापसुद्धा घामाचे ठिपके काळ्या मातीवर सांडतो, तेव्हा पीकरूपी मोती फुलतात हे लक्षात घेऊन 
सचिनजी यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने बोलावे, अशी विनंती देशभरातील शेतकऱ्यांच्या मुलांच्या वतीने करण्यासाठी आज आपण मुंबई येथे तेंडुलकर यांच्या घरासमोर आलो होतो, असे श्री. बागल यांनी नमूद केले. 

दरम्यान, श्री. बागल हे सचिन तेंडुलकर यांच्या मुंबईतील घराबाहेर उभे राहून असा प्रश्‍न उपस्थित करत असताना तेथील सुरक्षा रक्षकांनी त्यांना मज्जाव केला. तेव्हा श्री. बागल यांनी आपण लोकशाही मार्गाने श्री. तेंडुलकर यांना विनंती करण्यासाठी येथे आलो आहोत, असे स्पष्ट केले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ranjit Bagal protests in front of Sachin Tendulkars house in Mumbai