शेततळ्यांमधील पाणी कमी करा : सोलापूर जिल्हा कृषी विभागाचे आवाहन 

प्रमोद बोडके
Wednesday, 14 October 2020

यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे ओढ्या व नाल्यांमधून वाहणाऱ्या पाण्यातूनही शेततळ्यांमध्ये पुन्हा पाणी भरता येईल. सध्याच्या पाणी पातळी मधील किमान दोन फुटापर्यंत शेततळ्यातील पाणी तत्काळ कमी करावे. 
- रविंद्र माने, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी 

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पावसाची तीव्रता वाढत आहे. आज रात्रीनंतर पुन्हा पावसाची तिव्रता वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी आपली शेततळी भरुन ठेवली आहेत. त्या शेतकऱ्यांनी शेततळ्यातील पाणीसाठा कमी करावा असे आवाहन जिल्हा कृषी अधिक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने यांनी केले आहे. 

जिल्हा कृषी अधिक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने म्हणाले, सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वदूर पाऊस होत आहे. त्यामुळे सर्व जलस्त्रोत भरून वाहत आहेत, काही ठिकाणी पाझर तलाव, साठवण तलाव फुटल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झालेले आहे. या जलस्त्रोतांचा सांडवा असतो परंतु आपल्या शेतामध्ये असलेल्या शेततळ्याला कोणत्याही प्रकारे सांडवा नसल्याने ज्या शेतकऱ्यांनी शेततळी भरून ठेवलेली आहेत त्या शेतकऱ्यांनी तात्काळ शेततळे मधील पाणी कमी करून घ्यावे. आज रात्रीनंतर पावसाची तीव्रता वाढण्याची शक्‍यता आहे त्यामुळे शेततळे भरून वाहिल्यानंतर शेततळ्याचा भराव खचुन शेततळे फुटण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

मंगळवारी रात्रीपासूनच पावसाने सोलापूर जिल्ह्यात जवळपास सर्वच तालुक्‍यात कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली आहे. अक्कलकोट तालुक्‍यात आतापर्यंत सर्वाधिक पाऊस झाला आहे. या पावसामुळे अक्कलकोट तालुक्‍यातील ओढ्या, नाल्यांना पूर आला आहे. बार्शी तालुक्‍यातील नद्यांनाही मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. सध्या होणारी अतिवृष्टी 17 ऑक्‍टोंबरपर्यंत होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या पावसामुळे हाता तोंडाशी आलेली पिके शेतातच आडवी झाली आहेत. डोळ्यासमोर पिकांची होणारे नूकसान पाहून शेतकऱ्यांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण पसरले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reduce water in farms: Appeal of Solapur District Agriculture Department