श्री विठ्ठल मंदिर सभामंडप आणि परिवार देवता मंदिरांच्या जीर्णोद्धारास प्रारंभ !

Pariwar Devta
Pariwar Devta

पंढरपूर : श्री विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिर समितीने मंदिरातील सभामंडप आणि शहरातील पाच परिवार देवतांच्या मंदिरांच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू केले आहे. या सर्व कामांसाठी मिळून सुमारे एक कोटी 27 लाख 50 हजार रुपये खर्च होणार असून, बहुतांश खर्च देणगीदारांकडून करण्यात येणार आहे. या सर्व कामांचे भूमिपूजन श्री विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते करण्यात आले. 

श्री विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिर समितीने पंढरपूर शहर व परिसरातील अठ्ठावीस परिवार देवतांची मंदिरे 2015 मध्ये ताब्यात घेतलेली आहेत. या परिवार देवतांच्या मंदिरांचे संवर्धन करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला होता. त्यानुसार पुरातत्त्व विभागाच्या पॅनेलवरील आर्किटेक्‍ट प्रदीप देशपांडे यांची आर्किटेक्‍ट म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. श्री. देशपांडे यांनी परिवार देवतांची मंदिरे बांधकाम करण्याकामी डिझाईन व खर्चाचे अंमदाजपत्रक तयार करून दिले आहे. या परिवार देवतांच्या मंदिरांचा जीर्णोद्धार सेवाभावी तत्त्वावर मोफत करण्यासाठी दानशूर देणगीदारांनी मंदिर समितीकडे तयारी दर्शवली होती. तसेच मंदिरात विविध सण, उत्सवातील कार्यक्रम, भजन, कीर्तन व इतर अनुषंगिक कार्यक्रम श्री विठ्ठल सभामंडपामध्ये होतात. या सभामंडपाचे देखील नूतनीकरण करण्याची इच्छा पुण्यातील भाविकाने व्यक्त केली होती. 

गुरुवारी (ता. 25) सकाळी अकरा वाजता सर्व कामांचे भूमिपूजन सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी मंदिर समितीचे सदस्य शकुंतला नडगिरे, संभाजी शिंदे, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, नगराध्यक्षा साधना भोसले, कार्यकारी अधिकारी विठ्ठल तथा सुनील जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, देणगीदारांपैकी श्रीकांत कोताळकर, नानासाहेब पाचुंदकर पाटील आदी उपस्थित होते. 

गोपाळपूर रस्त्यावरील श्री रिद्धी सिद्धी गणपती मंदिराचे नूतनीकरण देणगीदार आणि मंदिर समितीच्या माध्यमातून केले जाणार आहे. त्यासाठी सुमारे 16 लाख 50 हजार रुपये खर्च येणार आहे. 

नूतनीकरण करण्यात येणार असलेल्या अन्य परिवार देवतांच्या मंदिरांची नावे, संबंधित देणगीदार आणि अंदाजित खर्च पुढीलप्रमाणे 
गोपाळपूर रस्त्यावरील लक्ष्मण पाटील देवस्थान (देणगीदार राम बच्चन यादव, आठ लाख रुपये), अंबाबाई मैदानाजवळील श्री अंबाबाई मंदिर (दीपक नारायण करगळ, पुणे, 25 लाख), हरिदास वेसलगतचे श्री रोकडोबा मंदिर (श्रीकांत कोताळकर, 23 लाख), महाद्वार घाटाजवळील श्री सोमेश्वर मंदिर (अशिम अशोक पाटील, कोल्हापूर, 25 लाख), श्री विठ्ठल मंदिर सभामंडप सागवानी काम (नानासाहेब दिनकरराव पाचुंदकर पाटील, पुणे, 30 लाख) 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com