दहावीचा निकाल बेस्ट ऑफ फाईव्हप्रमाणेच! 25 जूननंतर निकाल तर शाळा सुरू होणार 'या' दिवशी...

तात्या लांडगे
Friday, 8 May 2020

ठळक मुद्दे...

  • - लॉकडाऊनचा टप्पा वाढल्याने दहावीच्या उत्तरपत्रिका टपाल कार्यालयातच कुलूपबंद
  • - उत्तरपत्रिकांचे गट्टे संबंधित विषय शिक्षकांना पर्यंत न पोहोचल्याने निकाल लागणार 20 ते 25 दिवसांचा विलंब
  • - दहावीचा निकाल विलंबाने लागणार असला तरी पहिली ते नववीच्या शाळा होणार 15 जूननंतर सुरू; शालेय शिक्षणमंत्र्यांची माहिती
  • - 15 जूनपर्यंत बारावीचा तर 25 जूनपर्यंत दहावीचा निकाल जाहीर करण्याचे नियोजन; दहावीच्या भूगोलाचा पेपर रद्द झाल्यानंतर बेस्ट ऑफ फाईव्ह बोर्डाचे एकमत झाल्याची वरिष्ठ सूत्रांची माहिती

सोलापूर : देशातील लॉकडाऊनचा टप्पा 17 मेपर्यंत वाढविल्याने दहावीच्या उत्तरपत्रिकांचे गठ्ठे टपाल कार्यालयातच कुलूप बंद झाले. आता लॉकडाऊन उठल्यानंतर उत्तरपत्रिकांची तपासणी होणार आहे. त्यामुळे मागच्या वर्षाच्या तुलनेत 20 ते 25 दिवसांच्या विलंबाने दहावीचा निकाल लागेल. मात्र शाळा 15 जूननंतर सुरू करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली. भुगोलचा पेपर रद्द झाल्याने आणि निकालास विलंब होत असल्याने यंदा दहावीचा निकाल 'बेस्ट ऑफ फाईव्ह'प्रमाणेच लागेल, असे माहिती पुणे शिक्षण मंडळाच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
देशात विशेषतः महाराष्ट्रातील मुंबई, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, वसई- विरार, पुणे, सोलापूर, नागपूर, औरंगाबाद या ठिकाणी कोरोना या विषाणूचा विळखा वाढू लागला आहे. त्यामुळे अद्यापही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा पॅटर्न कसा असेल, याचा निर्णय झालेला नाही. मात्र, सद्यस्थिती पाहता पदवी व पदविकाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा व्हावी, असा निर्णय घेण्याचे नियोजन केले जात असल्याचे राज्यपाल नियुक्त समितीतील वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. दुसरीकडे कोरोनामुळे दहावीच्या भूगोलाचा पेपर रद्द करावा लागला. तर लॉकडाऊनचे टप्पे वाढल्याने तपासणीसाठी निघालेल्या दहावीच्या उत्तरपत्रिका टपाल कार्यालयातच अडकून पडल्या. त्यामुळे आता लॉकडाऊन उठल्यानंतर उत्तरपत्रिका तपासणीचे काम सुरू होणार आहे. त्यामुळे दरवर्षीपेक्षा यावर्षी दहावीचा निकाल उशिरा जाहीर होईल, असे ही शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये या हेतूने सरकारी कार्यालयांचे कामकाज बंदच आहे. त्यामुळे बारावीचा निकाल अद्यापही तयार झालेला नसून लॉकडाऊन संपल्यानंतर निकाल तयार करण्याच्या कामकाजाला गती येईल. परंतु दरवर्षीच्या तुलनेत यंदा बारावीचा निकाल 15 ते 20 दिवसांनी उशिरा लागणार आहे. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात (15 ते 20 जूनपर्यंत) बारावीचा निकाल जाहीर होईल, असेही पुणे बोर्डातील वरिष्ठ सूत्रांनी स्पष्ट केले. दहावीचा निकाल कशाप्रकारे लावावा, याबाबत पुणे शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांसमवेत विभागीय अध्यक्षांच्या तीन ते चार वेळा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठका पार पडल्या आहेत. उद्या (शनिवारी) महत्त्वाची बैठक होणार असून त्यामध्ये अंतिम निर्णय होईल, अशी माहिती विभागीय अध्यक्ष तुकाराम सुपे यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.

हेही वाचा : विधानपरिषदेत नऊपैकी ‘या’ जिल्ह्याला मिळणार दोन जागा?
निकालास किमान 20 दिवस विलंब होईल

लॉकडाऊनमुळे दहावीच्या काही विषयांच्या उत्तरपत्रिका टपाल कार्यालयातच अडकून पडल्या आहेत. तर अडकून पडलेल्या उत्तर पत्रिका उपलब्ध करून देण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांसमवेत पत्रव्यवहार झाला आहे. लॉकडाऊन वाढल्याने आणि पुढील परिस्थिती कशी असेल हे अस्पष्ट असल्याने यंदा दहावी व बारावीचा निकाल किमान 20 दिवसांनी उशिरा लागेल. तर 15 जूनपासून शाळा सुरू करण्याचे नियोजन आहे.
- वर्षा गायकवाड, शालेय शिक्षणमंत्री

निकालासाठी तीनपैकी निवडला एक पर्याय
देशातील लॉकडाऊनमुळे दहावीच्या भूगोल विषयाचा पेपर रद्द करावा लागला. इतिहासातील ही पहिलीच घटना असून लॉकडाऊनमुळे दहावीच्या अनेक विषयांच्या उत्तरपत्रिका ही अडकून पडल्या आहेत. त्यामुळे निकाल वेळेत लागावा, यादृष्टीने पुणे बोर्डाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. भूगोल विषयाला अन्य विषयांच्या गुणांची सरासरी करून गुण द्यावेत, भूगोल विषयाचे गुण वगळून अन्य विषयांच्या गुणांनुसार निकाल जाहीर करावा आणि पूर्वीप्रमाणे 'बेस्ट ऑफ फाईव्ह' असा निकाल जाहीर करावा, असे तीन पर्याय पुढे आले. त्यातील 'बेस्ट ऑफ फाईव्ह' या पर्यायावर पुणे बोर्डाच्या विभागीय अध्यक्षांनी एकमत दर्शवल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The result of 10th is the best of five