महसूल, कृषी, पशुसंवर्धन विभागाने एकत्रित करावेत पंचनामे, मुख्यमंत्री ठाकरे : संभाव्य अतिवृष्टीतही खबरदारी घेण्याची सूचना 

प्रमोद बोडके
Monday, 19 October 2020

पावसामुळे पुणे विभागातील जिल्हे आणि मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर आदी जिल्ह्यात नुकसान झाले आहे. नुकसानीचा आढावा घेवून राज्य शासन मदतीबाबत मंत्रीमंडळ बैठकीत विचार करेल. त्यासाठी लवकरात लवकर पंचनामे करण्याची आवश्‍यकता आहे. 
- बाळासाहेब थोरात, महसूल मंत्री 

सोलापूर : अतिवृष्टी आणि महापुरामध्ये नुकसान झालेल्या घरांचे, शेतीचे, जनावरांचे आणि जिवीत हानीची माहिती शक्‍य तितक्‍या लवकर संकलित करा. मदतीचा प्रस्ताव तातडीने पाठवावा. हे प्रस्ताव तयार करताना महसूल, कृषि, पशुसंवर्धन या सर्व विभागांनी एकत्रित पंचनामे करुन एकही नुकसानग्रस्त शेतकरी भरपाईपासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्या अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सोलापूर जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. 

अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज सात रस्ता येथील नियोजन भवनात आढावा बैठक घेतली. त्या बैठकीत त्यांनी या सूचना केल्या आहेत. बैठकीस महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, कृषी मंत्री दादाजी भुसे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार विनायक राऊत, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, आमदार प्रणिती शिंदे, मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह आदी उपस्थित होते. 

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, हवामान विभागाने येत्या आठवड्यात आणखी पाऊस पडण्याची शक्‍यता व्यक्त केली आहे. त्यादृष्टीने महसूल, पोलीस, जिल्हा परिषद आणि कृषि विभागाला सज्ज राहण्याच्या सूचना द्याव्यात. पूर येण्याची शक्‍यता असणाऱ्या भागातील नागरिकांचे लवकरात लवकर स्थलांतर करण्यात यावे. स्थलांतरित करण्यात आलेल्या नागरिकांची काळजी घ्यावी. येत्या काळात पडणाऱ्या पावसात कमीत कमी मनुष्यहानी होईल याकडे लक्ष द्यावे.

पुणे विभागातील सर्वाधिक जास्त नुकसान सोलापूर जिल्ह्यात झाल्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले. अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव म्हणाले, जिल्ह्यात शेती, फळबागा, रस्ते, वीज वहन यंत्रणा यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरु आहे. येत्या तीन चार दिवसात हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. 

बैठकीस पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर, पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, जलसंपदा विभागाचे जयंत शिंदे, धिरज साळे, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख आदी उपस्थित होते. 

मोठ्या प्रमाणावर नुकसान

जिल्ह्यातील जिल्हा परिषदेकडील रस्ते, पूल, पाणीपुरवठा योजना, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याची नोंद देखील नुकसानीच्या अहवालामध्ये घ्यावी. 
- दत्तात्रय भरणे, पालकमंत्री


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Revenue, Agriculture, Animal Husbandry Department should collect Punchnama, Chief Minister Thackeray: Suggestion to take precaution even in case of possible heavy rains