अक्कलकोट विधानसभा क्षेत्रातील रस्त्यांची तब्बल 100 कोटींची कामे प्रगतिपथावर ! 

MLA Kalyanshetti
MLA Kalyanshetti

अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट विधानसभा मतदार संघातील विविध रस्ते निर्माणासाठी गेल्या सव्वा वर्षात केंद्र व राज्य शासनाकडून एकूण 100 कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. यामुळे गावकऱ्यांची सोय होऊन, दळणवळण सुविधा वाढण्यास मदत होणार आहे, अशी माहिती आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली. 

यापूर्वी 2019-20 च्या निधीतून तिलाटी गेट ते आचेगाव मार्गे वळसंग 10 किलोमीटर रस्त्यासाठी 10 कोटी 79 लाख रुपये, मुस्ती ते तांदूळवाडी 9 किमीसाठी 10 कोटी 8 लाख, भुरीकवठे ते वागदरी 9 किमीसाठी 14 कोटी 42 लाख, अक्कलकोट स्टेशन ते तोळणूर सीमा हद्द 16 किमीसाठी 17 कोटी 9 लाख असे 53 कोटी 28 लाख निधी नुकताच मंजूर झाला आहे. यापैकी काही कामे युद्धपातळीवर सुरू असून काही कामे निविदा प्रक्रियेत आहेत. हा निधी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नातून मिळाला आहे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधून 2021 मध्ये घोळसागाव ते झोपडपट्टी अडीच किमीसाठी 2 कोटी 4 लाख, शावळ स्टेशन ते कल्लहिप्परगे या 4 किमीसाठी 1 कोटी 56 लाख, बणजगोळ ते ममनाबाद 2 किमीसाठी 1 कोटी 24 लाख, बादोले बु ते बादोले खु मार्गे शिरवळ 1 किमीकरिता 1 कोटी 39 लाख अशी कामे मंजूर असून या कामांची निविदा प्रक्रिया सुरू आहे. 

याबरोबरच मागील वर्षी राज्य अर्थसंकल्पात तब्बल 17 कोटी रुपये विविध रस्त्यांच्या कामांसाठी मंजूर करण्यात आले होते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यास तूर्त स्थगिती देण्यात आली होती, ती उठविण्यात आली आहे. यामुळे जेऊर - करजगी - तडवळ - कोर्सेगाव 1 कोटी 59 लाख, मुळेगाव ते दर्गनहळळी मार्गे धोत्री 43 किमी रस्त्यासाठी 1 कोटी 52 लाख, उळे ते कासेगाव मार्गे वडजी व बोरामणी 1 कोटी 64 लाख, होटगी ते औज व इंगळगी मार्गे जेऊर 2 कोटी 39 लाख, सुलेरजवळगे ते मंगरूळ मार्गे देवीकवठे 1 कोटी 20 लाख, साफळे ते बादोला व बोरगाव मार्गे घोळसगाव 1 कोटी 18 लाख, वळसंग ते मुस्ती 12 किमी रस्त्याच्या कामासाठी 22 कोटी 11 लाख यामुळे वडगाव, दिंडूर, धोत्री अशा पाच गावांना याचा फायदा होणार आहे. 

तसेच किणी ते बोरगाव मार्गे वागदरी 3 कोटी 30 लाख असा मागील सव्वा वर्षात एकूण 95 कोटी रुपये रस्ते निधी केंद्र व राज्य शासनाकडून मिळाला आहे. या माध्यमातून 210 किलोमीटर रस्त्याची काही कामे सुरू झाली असून काही कामांची निविदा प्रक्रिया सुरू आहे. या रस्त्याच्या बांधणीमुळे अक्कलकोट विधानसभा मतदार संघातील 45 गावांतील अत्यंत खराब रस्त्यांचे कामे मार्गी लागले आहे. यामुळे या भागातून दळणवळण मोठ्या प्रमाणात वाढण्यास मदत होणार आहे. तसेच मराठवाड्याला जोडण्यासाठी व कर्नाटक राज्यात प्रवेश करण्यासाठी नागरिकांना सोयीचे होत आहे. या कामी अक्कलकोट विधानसभेचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे योगदान लाभले आहे. तालुक्‍यातील खराब रस्त्यांसाठी 2008 पासून नागरिकांची ओरड होत होती. 

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात रस्त्याचा प्रश्‍न मोठा होता. त्यामुळे मी मागील सव्वा वर्षात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून 75 कोटी व उर्वरित राज्य सरकारकडून असा जवळपास 100 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून घेतला आहे. यापैकी काही कामे सुरू झाली असून काही कामे प्रगतिपथावर आहेत. तसेच कामाची निविदा प्रक्रिया सुरू आहे. आणखीन बरेच रस्ते अत्यंत खराब झालेले असून लवकरच ते पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे; जेणेकरून माझ्या कालावधीत मतदार संघातील मूलभूत सोयीसुविधांचा प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न राहणार आहे. 
- आमदार सचिन कल्याणशेट्टी 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com