बार्शी तालुक्‍यातील संगमनेरचा तलाव पहिल्याच वर्षी 'ओव्हरफ्लो'

प्रशांत काळे 
Sunday, 20 September 2020

या तलावाच्या भरावाची लांबी 525 मीटर तर भरावाची उंची 10.5 मीटर असून यंदा झालेल्या मुसळधार पावसामुळे साठवण तलाव प्रथमच पूर्ण क्षमतेने भरला आहे. त्यामुळे संगमनेर ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

बार्शी (सोलापूर) : संगमनेर (ता. बार्शी) येथील नवीन साठवण तलाव पहिल्याच वर्षी वरुणराजाच्या कृपेने पूर्ण क्षमतेने भरला आहे. यामुळे 102 हेक्‍टर जमीन ओलिताखाली येणार आहे. शासनाने या साठवण तलावासाठी 2 कोटी 50 लाख रुपये खर्च केला असून शेतकऱ्यांना तीन कोटी रुपये भूसंपादनासाठी मोबदला दिला आहे. नवीन झालेला साठवण तलाव प्रथमच भरल्याने संगमनेर ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. 
दरम्यान, या तलावासाठी 2013-14 मध्ये आघाडी सरकारच्या काळात माजी मंत्री दिलीप सोपल यांनी पाठपुरावा करुन पाणी उपलब्धता प्रमाणपत्रासाठी नाशिकला स्वतः जावून प्रमाणपत्र आणून काम मंजूर केले होते, अशी माहिती राजाभाऊ चव्हाण यांनी दिली. साठवण तलावाचे भूमीपूजनही करण्यात आले होते. पण सत्ताबदलानंतर सत्तेवर आलेल्या तत्कालीन सरकारने हे काम रद्द केले होते. तत्कालीन सरपंच महेश सावंत यांनी माजीमंत्री दिलीप सोपल यांच्याकडे कामाला पुन्हा मंजुरी घेण्यासाठी सतत पाठपुरवठा केला. सोपल यांनी तात्कालीन जलसंपदामंत्री राम शिंदे यांच्याकडे पाठपुरवठा करुन तलावास मंजुरी घेतली होती. तलावाचे काम 2019 मध्ये सुरु होवून पूर्णही झाले. 
या तलावाच्या भरावाची लांबी 525 मीटर तर भरावाची उंची 10.5 मीटर असून काम पूर्णत्वास नेण्यासाठी उपअभियंता धनंजय सावित्रे यांनी परिश्रम घेतले. यंदा झालेल्या मुसळधार पावसामुळे साठवण तलाव प्रथमच पूर्ण क्षमतेने भरला आहे. त्यामुळे संगमनेर ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या साठवण तलावातील पाण्याचे पूजन गौडगांव पंचायत समिती सदस्या कविता चव्हाण, सरपंच संपत चव्हाण, संगमनेरचे माजी सरपंच महेश सांवत, प्रगतशील बागायतदार आत्माराम भोसले आदींच्या उपस्थितीत झाले. 

संपादन : वैभव गाढवे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangamner lake in Barshi taluka overflowed in the first year