शासकीय नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर "या' शहरात पोलिसांची धडक कारवाई

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 जुलै 2020

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत; मात्र सांगोला शहरात व्यक्ती, वाहनचालक व दुकानदार हे शासकीय नियमांचे उल्लंघन करत असल्याचे वारंवार आढळत आहे. नियमभंग करणाऱ्यांवर अंकुश लावण्यासाठी सांगोला पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कारवाईचा बडगा उगारला असून, सोमवारी शहरात विविध ठिकाणी कारवाई करण्यात आली. 

सांगोला (सोलापूर) : शासकीय आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती, वाहनचालक व दुकानदारांविरोधात सांगोला पोलिसांनी धडक कारवाई करण्यास सुरवात केली आहे. सोमवारी (ता. 6) एकाच दिवसात मास्क न वापरणे, डबल सीट, ट्रिपल सीट यासह इतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 194 जणांवर कारवाई करत 44 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. 

हेही वाचा : ब्रेकिंग..! सोयाबीनच्या निकृष्ट बियाणांची विक्री; औरंगाबादच्या कंपनीविरोधात बार्शी तालुक्‍यात गुन्हा 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. मात्र व्यक्ती, वाहनचालक व दुकानदार हे शासकीय नियमांचे उल्लंघन करत असल्याचे वारंवार आढळत आहे. नियमभंग करणाऱ्यांवर अंकुश घालण्यासाठी सांगोला पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कारवाईचा निर्णय घेतला असून, सोमवारी शहरात विविध ठिकाणी कारवाई करण्यात आली. 

हेही वाचा : अबब..! शहरातील 45 हजार वाहनचालकांनी मोडला नियम..! पोलिसांनी केला "एवढा' दंड 

मास्क न वापरणाऱ्या 135 जणांवर कारवाई करत पोलिसांनी 13 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला. डबल सीट दुचाकी चालवणाऱ्या 38 जणांकडून 19 हजार रुपयांचा दंड वसूल केला. ट्रिपल सीट दुचाकी चालवणाऱ्या चार जणांकडून तीन हजार रुपयांचा दंड वसूल केला. दोनपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणाऱ्या एका चारचाकी वाहनावर कारवाई करत 500 रुपयांचा दंड वसूल केला. दुकानात पाचपेक्षा जास्त व्यक्ती असणाऱ्या 16 दुकानदारांवर कारवाई करत आठ हजार रुपयांचा दंड वसूल केला. अशा प्रकारे दिवसभरात 194 केसेस करत तब्बल 44 हजारांचा दंड सांगोला पोलिसांनी वसूल केला. ही कारवाई पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलिसांच्या या कारवाईमुळे तरी नागरिक बोध घेतील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत करतील, अशी आशा केली जात आहे. 

पोलिस निरीक्षक राजेश गवळी म्हणाले, नागरिकांनी नियमांचा काटेकोरपणे अंमलबजावणी केली पाहिजे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येकाने स्वतःची काळजी घेऊनच घराबाहेर पडावे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रत्येकाविरुद्ध यापुढेही कडक कारवाई करण्यात येईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangola police action against those violating government rules