सोलापुकरांनो पाणी जपून वापरा ! रविवारपर्यंत कमी दाबाने, कमी वेळ अन्‌ उशिराने येणार पाणी 

तात्या लांडगे
Friday, 16 October 2020

टाकळी हेडला अक्‍कलकोट सबस्टेशनवरुन वीज देण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. मात्र, या कामासाठी काही दिवसांचा वेळ लागणार असल्याने शहर व हद्दवाढ भागाला 18 ऑक्‍टोबरपर्यंत कमी दाबाने, कमी वेळ व उशीराने पाणी पुरवठा होणार आहे. 

सोलापूर : मुसळधार पावसामुळे सीना नदीला पूर आला असून नांदूरजवळील वीजेचा टॉवर लाईन बंद पडली आहे. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडीत झाला असून देगाव सबस्टेशनहून मंद्रूप सबस्टेशनला होणारा वीज पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे टाकळी हेडला अक्‍कलकोट सबस्टेशनवरुन वीज देण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. मात्र, या कामासाठी काही दिवसांचा वेळ लागणार असल्याने शहर व हद्दवाढ भागाला 18 ऑक्‍टोबरपर्यंत कमी दाबाने, कमी वेळ व उशीराने पाणी पुरवठा होणार आहे.

 

सोलापूर शहराला टाकळी हेडवर्क्‍स योजनेद्वारे पुरेशा प्रमाणात पाण्याचा उपसा होणार नाही. त्यामुळे सोरेगाव जलशुध्दीकरण केंद्रावरुन होणारा पाणी पुरवठा रविवारपर्यंत (ता. 18) नियोजित वेळेत होणार नाही, असे महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य अभियंता संजय धनशेट्टी यांनी पत्राद्वारे स्पष्ट केले आहे. या पार्श्‍वभूमीवर शहर व हद्दवाढ भागाला कमी दाबाने, कमी वेळ आणि उशीराने पाणी पुरवठा होणार आहे. एक रोटेशन चार दिवसाआड होईल, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे. तरी नागरिकांनी नियोजनबध्द पाण्याचा वापर करावा, पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saturday and Sunday Water will come at low pressure, low time and late till solapur city