शाळा सोडलेल्या विद्यार्थ्यांना आणले शाळेत : गजाला शेख यांची सामाजिक बांधिलकी 

Gajala Shekh.jpeg
Gajala Shekh.jpeg

आम्ही नवदुर्गा 
सोलापूर
: आर्थिक परिस्थितीमुळे शाळेपासून दूर गेलेल्या चिमुकल्यांना शाळेच्या प्रवाहात आणण्याच्या हेतूने स्वत:हून मदत करण्याचा उपक्रम महापालिकेच्या 26 नंबर शाळेतील शिक्षिका गजाला तबस्सूम शेख यांनी राबविला आहे. मागील तीन वर्षांत 15 हून अधिक विद्यार्थी पुन्हा शाळेत रमली असून त्यांना शिक्षणाची गोडी लागली आहे. 

कुटुंबातील सदस्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न, काम केल्यावरच पोट भरते, अशी परिस्थिती असलेल्या कुटुंबातील मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्याच्या हेतूने स्वत:च्या पगारातून अर्थसहाय करण्याची सामाजिक बांधिलकी महापालिकेच्या कॅम्प शाळेतील शिक्षिका गजाला शेख यांनी जोपासली आहे. दक्षिण सदर बझार, लष्कर परिसरातील या शाळेत केशव नगर झोपडपट्टी, मौलाली चौक, कुंभार गल्ली, लोधी गल्ली, शास्त्री नगर, बापूजी नगर, गुरुनानक चौक परिसरातील गरीब कुटुंबातील मुले शाळेत शिकत आहेत. कुटुंबाला मदत होईल म्हणून अनेक पालकांनी आपल्यासोबत कामासाठी नेलेल्या मुलांना पुन्हा शाळेच्या प्रवाहात आणण्यात गजाला शेख यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. 

शिक्षिका गजाला शेख यांनी सांगितले की, आर्थिक परिस्थितीचे कारण पुढे करून मुलांना शाळेपासून दूर ठेवणाऱ्या पालकांचे प्रबोधन करुन त्या मुलांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणल्याचा आनंद आहे. अशा पालकांना विश्‍वास देऊन त्यांना अर्थसहाय, धान्याच्या स्वरुपात मदत करणे, मुलांना शिष्यवृत्ती मिळवून देणे, त्यांना शालेय साहित्यापासून कपडे पुरविण्याचेही काम आम्ही स्वखर्चातून करतो. 

शैक्षणिक उठावाचा राबविला उपक्रम 
शाळेचे माजी विद्यार्थी डॉक्‍टर, पोलिस, अभियंता यासह अन्य पदांवर आहेत. त्यांच्या माध्यमातून शाळेत शिकणाऱ्या गोरगरिब मुलांना मदत व्हावी म्हणून शैक्षणिक उठाव हा उपक्रम सुरू केला. त्यामुळे दरवर्षी काही माजी विद्यार्थी आर्थिक तथा शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून प्रशालेस मदत करतात. त्यातून प्रशालेतील गोरगरिब विद्यार्थ्यांच्या तथा त्यांच्या पालकांच्या मनात शाळा जोडून जाण्याचा विचार येऊ नये म्हणून मदत केली जाते. काही दिवसांपूर्वी रिक्षाचालकाने त्यांच्या दोन मुलांचा खर्च करणे कठीण असल्याने शाळेतून काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना आर्थिक व शैक्षणिक मदत करुन मुलांना शाळेत कायम ठेवण्यास भाग पाडल्याचेही गजाला शेख यांनी आवर्जून सांगितले. दुसरीकडे राष्ट्रीय आपत्ती तथा नैसर्गिक आपत्ती काळात सामाजिक बांधिलकी म्हणून शाळेतर्फे मदत केली जाते, असेही त्यांनी यावेळी सांगितले. 


संपादन : अरविंद मोटे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com