सोलापूर जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, सिनेमागृहे, जलतरण तलाव 31 ऑक्‍टोबरपर्यंत राहणार बंदच 

प्रमोद बोडके
Thursday, 1 October 2020

काय बंद राहणार 
शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, शिकवणी वर्ग बंद. मात्र ऑनलाईन/दूरस्थ शिक्षणाला परवानगी, सिनेमागृहे, जलतरण तलाव, मनोरंजन केंद्रे, थिअटर्स (मॉलमधील व बाजार संकुलातील थिअटर्ससह), सभागृहे, सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व सभा, केंद्रीय गृह मंत्रालयाने परवानगी दिलेले प्रवाशी वगळून आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासास बंदी 

सोलापूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, संसर्ग कमी करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात (पोलीस आयुक्तालय हद्द वगळून) लॉकडाऊनचे निर्बंध 31 ऑक्‍टोबरपर्यंत वाढविण्यात आले आहेत. या काळात शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, शिकवणी वर्ग बंद, सिनेमागृहे, जलतरण तलाव, मनोरंजन केंद्रे, थिअटर्स बंद राहणार आहेत. याबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आदेश जारी केले आहेत. 

यापूर्वी ज्या उपक्रमाला वेळोवेळी सशर्त परवानगी देण्यात आली होती, ते यापूर्वीप्रमाणे लागू राहतील. कोविड-19 व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय निर्देशाचे पालन करणे आवश्‍यक असून दोषीविरूद्ध दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार आहे. सार्वजनिक, कामाच्या ठिकाणी आणि प्रवासामध्ये चेहऱ्यावर मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे. सार्वजनिक ठिकाणी सहा फुटांचे सुरक्षित अंतर ठेवावे, पाचपेक्षा अधिक ग्राहकांना दुकानात येण्यास परवानगी देऊ नये. मोठ्या सार्वजनिक मेळाव्यावर बंदी असेल. विवाहस्थळी 50 नागरिकांना एकत्र येण्यास परवानगी असेल, अंत्ययात्रेला 20 नागरिकांना एकत्र येऊ शकतील. सार्वजनिक ठिकाणी थुकण्यास बंदी असून दारू, पान, गुटखा, तंबाखूचे सेवनावर कडक निर्बंध असणार आहेत, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. 

कामाच्या ठिकाणी जास्तीत जास्त आस्थापनांनी कर्मचाऱ्यांकडूवन घरातून काम करून घ्यावे. कार्यालये, दुकाने, मार्केट, औद्योगिक आस्थापनामध्ये कामाच्या वेळेत पुरेसे अंतर असावे. स्क्रिनिंग आणि स्वच्छता यावर भर द्यावा. शिफ्ट बदलताना वारंवार स्वच्छता, सॅनिटायझरचा वापर करावा. कामगारांमध्ये सुरक्षित अंतर असेल, याची खबरदारी घ्यावी, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती, संस्था, संघटना यांच्यावर कलम 188 आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 नुसार कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे, त्याचबरोबर प्रतिबंधित सांसर्गिक क्षेत्रामध्ये (कंटेन्मेट झोन) यापूर्वी देण्यात आलेले आरोग्यविषयक आदेश लागू राहतील. 
 
काय सुरू राहणार 
सर्व अत्यावश्‍यक सेवेची दुकाने/आस्थापना यापूर्वीच्या आदेशात नमूद केलेल्या निर्देशानुसार सुरू, यापूर्वी वेळोवेळी चालू करण्यास मान्यता दिलेले उपक्रम यापुढेही चालू राहतील, हॉटेल, फुड कोर्ट, रेस्टॉरंट, बार यांना 5 ऑक्‍टोबर 2020 पासून एकूण क्षमतेच्या 50 टक्के. स्थानिक प्रशासनाच्या मान्यतेनुसार परवानगी. आवश्‍यक त्या उपाययोजनाबाबत महाराष्ट्र पर्यटन विभाग मानक कार्यपद्धती निश्‍चित करेल, ऑक्‍सिजनची वाहतूक करणारी वाहने राज्यात व राज्याबाहेर वेळेच्या बंधनाशिवाय मुक्तपणे वाहतूक. ऑक्‍सिजन उत्पादक कारखान्यांना व पुरवठाधारक/वितरकांना बंधने असणार नाहीत, केंद्र/ राज्य शासनाने कोविड-19 बाबत दिलेल्या निर्देशांचे पालन करून राज्यातून सुरू होणाऱ्या व संपणाऱ्या सर्व रेल्वे तत्काळ सुरू होतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Schools, colleges, cinemas, swimming pools in Solapur district will remain closed till October 31