
माढा तालुक्यातील मोठी आणि महत्त्वाची ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या मोडनिंब ग्रामपंचायत निवडणुकीची लढत दुरंगी होत आहे. मोठा गाजावाजा करत नवीन पिढीच्या हाती सत्ता सोपविण्याची चर्चा असताना, सात माजी सरपंचांसह जिल्हा परिषदेच्या माजी सभापतीही निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. तर काही मातब्बरांना प्रभाग आरक्षणाचा फटका बसल्याने माघार घ्यावी लागली.
मोडनिंब (सोलापूर) : माढा तालुक्यातील मोठी आणि महत्त्वाची ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या मोडनिंब ग्रामपंचायत निवडणुकीची लढत दुरंगी होत आहे. मोठा गाजावाजा करत नवीन पिढीच्या हाती सत्ता सोपविण्याची चर्चा असताना, सात माजी सरपंचांसह जिल्हा परिषदेच्या माजी सभापतीही निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. तर काही मातब्बरांना प्रभाग आरक्षणाचा फटका बसल्याने माघार घ्यावी लागली. सहा प्रभागांत होणाऱ्या निवडणुकीत 17 जागांसाठी 42 उमेदवार रिंगणात आहेत.
येथील ग्रामपंचायतमध्ये सध्या राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कैलास तोडकरी यांच्या शहर विकास आघाडीची सत्ता आहे. मागील निवडणुकीत ग्रामविकास आघाडी व लोकशाही आघाडी यांचा पराभव करून त्यांनी सत्ता मिळवली. ग्रामविकास आघाडीचे बाबूराव सुर्वे व त्यांच्या पत्नी माजी महिला व बालकल्याण सभापती नंदा सुर्वे हे दोघे एकाच प्रभागातून शहर विकास आघाडीकडून लढत आहेत. अनेक वर्षे सत्तेत असलेली लोकशाही आघाडी "नाना' मार्गाने एकत्रित आल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे हेही एका प्रभागापुरते वेगळी चूल मांडून निवडणुकीत उतरले आहेत. कोरोना काळात मंदावलेल्या जनमानसाला निवडणुकीच्या वाऱ्याने उत्साह निर्माण केला आहे.
मोडनिंब परिसरातील अरण, बावी, बैरागवाडी, जाधववाडी, सोलंकरवाडी येथेही निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. अरण ग्रामपंचायतीमध्ये 13 पैकी आठ जागा बिनविरोध निवड झाल्या आहेत. तर बैरागवाडी ग्रामपंचायतीमध्ये नऊपैकी दोन जागा बिनविरोध झाल्या आहेत. सोलंकरवाडी, जाधववाडी येथे दुरंगी लढती रंगल्या आहेत.
राजकारणी अन् रसिकांची वर्दळ
लॉकडाउननंतर आता मोडनिंबमधील कला केंद्र खुली झाली अन् ढोलकीचा ताल कला केंद्रात घुमू लागला आहे. दुसरीकडे, मोडनिंबमध्येही ग्रामपंचायत निवडणुकीचा उत्साह आणि कला केंद्रातील दैनंदिन उत्सव एकाच वेळी सुरू झाल्याने राजकारणी आणि रसिकांची वर्दळ वाढली आहे.
संपादन : श्रीनिवास दुध्याल