esakal | सहकारी संस्थांचा कारभार कशा पद्धतीने करावा याचे सुधाकरपंत हे उत्तम उदाहरण होते : शरद पवार 
sakal

बोलून बातमी शोधा

Paricharak Niwas

शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या विषयी सुधाकरपंतांच्या समवेत आपली अनेक वेळा चर्चा व्हायची. शेतकऱ्यांच्या विषयी त्यांना कमालीचा जिव्हाळा होता. सहकारी संस्थांचा कारभार कशा पद्धतीने करावा याचे सुधाकरपंत हे उत्तम उदाहरण होते. त्यांच्या अनेक आठवणी आहेत. त्यांच्या पश्‍चात मोठी जबाबदारी तुमच्यावर असून, पंतांच्या प्रमाणेच चांगले काम करा, असा सल्ला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी आमदार प्रशांत परिचारक यांना दिला. 

सहकारी संस्थांचा कारभार कशा पद्धतीने करावा याचे सुधाकरपंत हे उत्तम उदाहरण होते : शरद पवार 

sakal_logo
By
अभय जोशी

पंढरपूर (सोलापूर) : शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या विषयी सुधाकरपंतांच्या समवेत आपली अनेक वेळा चर्चा व्हायची. शेतकऱ्यांच्या विषयी त्यांना कमालीचा जिव्हाळा होता. सहकारी संस्थांचा कारभार कशा पद्धतीने करावा याचे सुधाकरपंत हे उत्तम उदाहरण होते. त्यांच्या अनेक आठवणी आहेत. त्यांच्या पश्‍चात मोठी जबाबदारी तुमच्यावर असून, पंतांच्या प्रमाणेच चांगले काम करा, असा सल्ला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी आमदार प्रशांत परिचारक यांना दिला. 

माजी आमदार व जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते सुधाकरपंत परिचारक यांचे मागील महिन्यात निधन झाल्याने आज श्री. पवार यांनी परिचारक यांच्या वाड्यात येऊन त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून श्रद्धांजली वाहिली. अनेक वर्षे सुधाकरपंतांनी श्री. पवार यांच्या नेतृत्वाखाली काम केले होते. पंतांची कामाची पद्धत पाहून श्री. पवार यांनी त्यांच्यावर अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्याही सोपवल्या होत्या. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेनंतरच्या राजकीय घडामोडींच्या काळातही परिचारकांनी श्री. पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची भूमिका घेतली होती. 

पंढरपूरला आल्यानंतर श्री. पवार यांनी अनेक वेळा सुधाकरपंतांच्या वाड्यात सदिच्छा भेट दिली होती. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत श्री. परिचारक यांनी भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवली; परंतु अनेक वर्षे एकत्रित काम केलेले असल्याने दोन्ही नेत्यांमधील जिव्हाळा कायम होता. 

आज श्री. पवार यांनी सुधाकरपंतांविषयीच्या अनेक आठवणींना उजाळा देत त्यांचे ज्येष्ठ बंधू व आमदार प्रशांत परिचारक यांचे वडील ऍड. प्रभाकरराव परिचारक आणि परिचारक कुटुंबीयांचे सांत्वन केले. या वेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार भारत भालके, आमदार बबनराव शिंदे, सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे, युटोपियन शुगरचे अध्यक्ष उमेश परिचारक, युवा नेते प्रणव परिचारक, महेश परिचारक उपस्थित होते. 

श्री. पवार यांनी त्यानंतर संत कैकाडी महाराज मठामध्ये जाऊन कै. रामदास महाराज जाधव यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यांनी नंतर आमदार भारत भालके यांच्या जिल्हा न्यायालयाजवळील निवासस्थानी भेट दिली. साखर कारखान्याच्या अडचणींविषयी श्री. भालके यांनी श्री. पवार यांच्याशी चर्चा केली. तेव्हा आवश्‍यक ती मदत करण्याचे आश्वासन श्री. पवार यांनी दिले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल