ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांबाबत शरद पवार घेणार अंतिम निर्णय 

प्रदीप बोरावके 
Wednesday, 7 October 2020

याबाबत राज्य ऊसतोड कामगार वाहतूक व मुकादम संघटनेचे अध्यक्ष प्रदीप भांगे म्हणाले, मागण्यांबाबत निर्णय न झाल्याने ऊसतोड कामगारांचा संप चालूच आहे. कोणीही कोयता हातात घेऊ नये. हक्काची दरवाढ झाल्याशिवाय मुकादमांनी वाहने भरून कारखान्यावर जाऊ नये. 

माळीनगर (सोलापूर) : ऊसतोड कामगारांच्या विविध मागण्यांसंदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार पुढील आठवड्यात अंतिम निर्णय घेणार आहेत. साखर संघ व कामगार संघटनांच्या बैठकीत आज हा निर्णय झाला. त्यामुळे ऊसतोड कामगारांचा प्रश्न अखेर शरद पवार यांच्या कोर्टात गेला आहे. दरम्यान, मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच राहणार असल्याचे ऊसतोड कामगार संघटनांनी म्हटले आहे. 
ऊसतोड कामगारांनी त्यांच्या प्रश्नांबाबत संपाचे हत्यार उपसले आहे. संपाबाबत महाराष्ट्र राज्य साखर संघ व विविध ऊसतोड कामगार संघटनांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज तिसरी बैठक झाली. या बैठकीस साखर संघाकडून संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, कामगार संघटनेच्यावतीने महाराष्ट्र राज्य ऊसतोड कामगार मुकादम व वाहतूक संघटचे अध्यक्ष प्रदीप भांगे व संघटनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. याविषयी साखर संघ व ऊसतोड संघटना यांच्यात मुंबईत 10 सप्टेंबर व पुण्यात 24 सप्टेंबरला दोनदा बैठका झाल्या होत्या. मात्र, त्यावेळी समाधानकारक तोडगा निघाला नव्हता. गाळप हंगाम 15 ऑक्‍टोबरपासून सुरू होणार असल्याने पुढील आठवड्यात होणाऱ्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
ऊसतोड कामगार दरवाढ, कोरोना विमा, गोपीनाथराव मुंडे कल्याणकारी महामंडळ, ऊसतोड कामगारांसाठी स्वतंत्र 25 बेड उपलब्ध करून देणे, पुढील करार तीन-तीन वर्षांसाठी करणे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मजुरांच्या मुलांचा शिक्षण प्रश्न गंभीर असून साखर शाळा, निवासी शाळा, आश्रमशाळा या बंद आहेत. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात गावोगावी ऊसतोड कामगारांच्या स्थलांतरानंतर भोजन व्यवस्था सुरू करणे, महिलांचे प्रश्न या विषयावर आजच्या बैठकीत चर्चा झाली. सर्व बाबीचा विचार करून साखर संघाचे अध्यक्ष दांडेगावकर व हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार हेच यावर अंतिम निर्णय घेतील, असे सांगितले. 

संपादन : वैभव गाढवे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Pawar will take the final decision regarding the issues of sugarcane workers