मर्कटलीला आली अंगलट ! शिराळे येथे पाच शाळकरी मुलांचा घेतला माकडाने चावा 

अनिल जोशी 
Monday, 1 March 2021

शिराळे (ता. बार्शी) येथे पाच शाळकरी मुलांना एका माकडाने चावा घेतला. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून हे माकड गावभर फिरत आहे. शाळेला सुटी असल्याने मुले त्याच्या मर्कटलीला पाहून मजा लुटत होती व माकडाला हुसकावून लावण्यासाठी त्यांच्या मागे - मागे करत होती. 

चारे (सोलापूर) : शिराळे (ता. बार्शी) येथे पाच शाळकरी मुलांना एका माकडाने चावा घेतला. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून हे माकड गावभर फिरत आहे. शाळेला सुटी असल्याने मुले त्याच्या मर्कटलीला पाहून मजा लुटत होती व माकडाला हुसकावून लावण्यासाठी त्यांच्या मागे - मागे करत होती. 

शिराळे गाव पाथरी मध्यम प्रकल्पाच्या बॅकवॉटरच्या कडेला आहे. गेल्या दोन वर्षांपासून प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरत असल्याने परिसरात पाण्याची सुबत्ता आहे. पाण्याबरोबरच चाऱ्याचीही रेलचेल असल्याने या परिसरात वन्य प्राण्यांचा मोठा वावर सुरू झाला आहे. वन्य प्राण्यांच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी अगोदरच त्रस्त आहेत. रानडुक्कर, काळवीट, हरीण, ससे, सायाळ, खोकड, लांडगे, कोल्हे, तरस याबरोबरच विविध प्रकारचे पक्षी या परिसरातील पिके फस्त करत आहेत तर काही शेतकऱ्यांवर प्राणघातक हल्ले होत असतात. 

यातच आता या माकडाची भर पडली आहे. माकडाने दोन दिवसांत कार्तिक चौधरी, अथर्व खैरे, प्रतीक चौधरी, सार्थक चौधरी, पिलू चौधरी या मुलांना चावा घेऊन जखमी केले आहे. त्यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार केल्याचे माजी सरपंच जयराम पखाले यांनी सांगितले. या माकडाचा ताबडतोब बंदोबस्त करण्याची मागणी नूतन सरपंच निर्मला बाळासाहेब अंकुशे यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे. माकड पिसाळलेले असल्याने हल्ला करत असल्याची चर्चा ग्रामस्थ करत आहेत. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता गावकऱ्यांच्या मदतीने माकड पकडले असल्याचे सांगण्यात आले. 

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्‍यात बिबट्याची दहशत पसरली होती. काही गावांमध्ये अज्ञात हिंस्र प्राण्यांचे हल्ले वाढत आहेत. अशातच शिराळे गावामध्ये या माकडाने शाळकरी मुलांना चावा घेऊन जखमी केल्याने हिंस्र प्राण्यांबाबत सर्वत्रच दहशत पसरली आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Shirale five school children were bitten by a monkey and injured