शिवसेना निर्णय घेईना, आमदार सावंत लक्ष देईनात ! सावंतांना सक्रिय करण्याचा पडतोय हास्यास्पद पायंडा 

प्रमोद बोडके 
Thursday, 14 January 2021

सोलापूरचे संपर्कप्रमुख माजी मंत्री आमदार तानाजी सावंत हे सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेकडे लक्ष देत नाहीत. आमदार तानाजी सावंत यांच्याकडे असलेल्या संपर्कप्रमुख पदाबाबत शिवसेना निर्णय घेत नाही. शिवसेना आणि संपर्कप्रमुख यांची निष्क्रियता आता सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेला मारक ठरू लागली आहे. 

सोलापूर : सोलापूरचे संपर्कप्रमुख माजी मंत्री आमदार तानाजी सावंत हे सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेकडे लक्ष देत नाहीत. आमदार तानाजी सावंत यांच्याकडे असलेल्या संपर्कप्रमुख पदाबाबत शिवसेना निर्णय घेत नाही. शिवसेना आणि संपर्कप्रमुख यांची निष्क्रियता आता सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेला मारक ठरू लागली आहे. सावंत सक्रिय व्हावेत यासाठी केल्या जाणाऱ्या मागण्यांच्या माध्यमातून शिवसेनेत सध्या हास्यास्पद पायंडा पडताना दिसत आहे. 

2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सोलापूरचे संपर्क प्रमुखपद तत्कालीन मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे आले. संपर्कप्रमुखपद त्यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी बार्शीसाठी माजी मंत्री दिलीप सोपल, सोलापूर शहर मध्यसाठी माजी आमदार दिलीप माने, करमाळ्यासाठी रश्‍मी बागल या नेत्यांना शिवसेनेत आणले, उमेदवारीही देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या नेत्यांना प्रवेश दिल्याने त्या त्या मतदारसंघातील जुन्या नेत्यांची उमेदवारी ऐनवेळी कापली गेल्याने शिवसेनेतील संघर्षाची दरी वाढतच गेली आहे. आमदार सावंत यांच्यामुळे सेनेत आलेले बहुतांश नेते आज मौन बाळगून आहेत. त्या त्या भागातील जुने पदाधिकारी या नव्या नेत्यांना सोबत घेत नाहीत. त्यामुळे हे नेते फक्त निवडणुकीपुरते आहेत का, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. 

महेश कोठे शिवसेना सोडून का गेले? 
महेश कोठे यांच्या माध्यमातून शिवसेनेला सोलापूर शहरात तगडा नेता मिळाला होता. 2017 च्या महापालिका निवडणुकीत भाजपनंतर दुसऱ्या क्रमांकाचे नगरसेवक निवडून आणण्यात त्यांनी मोलाची कामगिरी केली. महापालिकेत कोठेंनी शिवसेनेची कॉलर ताठ केली; परंतु महेश कोठेंना शिवसेना 2019 ची उमेदवारीही देऊ शकली नाही, ही वस्तुस्थिती आहे. कोठेंमुळे शिवसेनेचे नगरसेवक वाढले मग शिवसेनेने कोठेंना काय दिले? हा प्रश्न आजही अनुत्तरीतच आहे. कोठे सोडून का गेले? याबद्दल शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनीही विचार केल्यास भविष्यातील धोका टळू शकतो. जनाधार असलेले नेते शिवसेनेपासून का दुरावत चालले आहेत, याचा विचार न झाल्यास आगामी काळात सेनेला मोठा फटका बसण्याची शक्‍यता आहे. करमाळा तालुक्‍यातील खरी शिवसेना कोणाची? माजी आमदार नारायण पाटील यांची की रश्‍मी बागल यांची? या प्रश्नाचे उत्तर अद्याप सुटलेले नाही. तशीच परिस्थिती बार्शी, मोहोळ, सोलापूर शहर व परिसरातील मतदारसंघांमध्ये आहे. या प्रश्नाचे उत्तर जोपर्यंत स्पष्ट होत नाही, तोपर्यंत शिवसेनेतील हा गोंधळ असाच कायम राहण्याची शक्‍यता आहे. 

संपर्कप्रमुख हवेत स्थानिकच 
सोलापूर जिल्ह्यातील कोणत्या मतदारसंघातील कोणत्या नेत्याचे कोणासोबत पटते आणि कोणाला कोणाची ऍलर्जी आहे, या गोष्टी संपर्कप्रमुख म्हणून सोलापुरात येणाऱ्या जिल्ह्याबाहेरील नेतृत्वाला सहजासहजी समजून येत नाहीत. राष्ट्रवादीप्रमाणेच शिवसेनेत असणारा हा बारीक भेद समजण्यासाठी संपर्क प्रमुखपद हे सोलापूर जिल्ह्यातीलच ज्येष्ठ व सर्वसमावेशक व्यक्तीकडे असायला हवे. समन्वयाने शिवसेनेतील संवादाची दरी कमी होऊ शकते. 

संपर्क मंत्र्यांचेही सोलापूरकडे दुर्लक्ष 
राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्याकडे सोलापूर जिल्ह्याच्या संपर्कमंत्री पदाची जबाबदारी शिवसेनेने सोपविली आहे. त्यांच्याकडे जबाबदारी आल्यापासून त्यांचा सोलापूरचा दौरा व पदाधिकाऱ्यांसोबत संवाद अद्यापही झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शिवसेनेला एकसंध बांधणारे अधिकारवाणीचे नेतृत्वच शिल्लक राहिलेले नाही. त्याचा परिणाम निवडणुकांमध्ये अपयश, असलेल्या नेत्यांमध्ये नाराजी, गटबाजी या गोष्टी वारंवार समोर येताना दिसत आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena leaders is trying again to activate MLA Sawant