श्री क्षेत्र खंडोबाची यात्रा रद्द ! धार्मिक विधीसाठी फक्‍त मानकऱ्यांनाच परवानगी

तात्या लांडगे
Wednesday, 16 December 2020

आज पार पडली बैठक
बाळे येथील श्री क्षेत्र खंडोबा यात्रेस 20 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. मंगळवारी (ता. 15) घटस्थापना झाली असून आता मार्गशीर्ष शुध्द चंपाषष्ठीदिवशी दरवर्षी मोठी यात्रा भरते. तिथून 27 डिसेंबर, 3 व 10 जानेवारीला रविवारनिमित्ताने भाविक दर्शनासाठी मंदिरात मोठ्या संख्येने येतात. सोलापूरसह राज्यभरातून व परराज्यातून भाविक दर्शनासाठी येतात. त्यानिमित्ताने आज (बुधवारी) महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर, पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांच्यासमवेत मंदिराचे मानकऱ्यांची बैठक पार पडली. त्यामध्ये कोरोनामुळे दरवर्षीप्रमाणे यात्रा साजरी करण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. पारंपारिक धार्मिक विधीसाठी केवळ मानकरी व पुजाऱ्यांनाच परवानगी देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.

सोलापूर : घटस्थापनेपासून (ता. 15) श्री क्षेत्र खंडोबा यात्रेला प्रारंभ झाला असून त्यानंतर पुढील चार रविवारी यात्रा भरते. बाळे येथे दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने मंदिरात येतात. मात्र, कोरोनामुळे आता यात्रा रद्द करुन धार्मिक विधीसाठी मानकरी व पुजाऱ्यांनाच परवानगी देण्यात आली आहे. किमान 50 जण उपस्थितीत राहतील, असेही पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

आज पार पडली बैठक
बाळे येथील श्री क्षेत्र खंडोबा यात्रेस 20 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. मंगळवारी (ता. 15) घटस्थापना झाली असून आता मार्गशीर्ष शुध्द चंपाषष्ठीदिवशी दरवर्षी मोठी यात्रा भरते. तिथून 27 डिसेंबर, 3 व 10 जानेवारीला रविवारनिमित्ताने भाविक दर्शनासाठी मंदिरात मोठ्या संख्येने येतात. सोलापूरसह राज्यभरातून व परराज्यातून भाविक दर्शनासाठी येतात. त्यानिमित्ताने आज (बुधवारी) महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर, पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांच्यासमवेत मंदिराचे मानकऱ्यांची बैठक पार पडली. त्यामध्ये कोरोनामुळे दरवर्षीप्रमाणे यात्रा साजरी करण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. पारंपारिक धार्मिक विधीसाठी केवळ मानकरी व पुजाऱ्यांनाच परवानगी देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.

श्री क्षेत्र खंडोबा यात्रेची चारशे वर्षांची परंपरा आहे. देवदर्शनासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेशातून भाविक बाळे येथे येतात. यात्रा काळात दररोज पहाटे पाच वाजता 'श्री'ची काकड आरती होते. सकाळी आठ वाजता व सायंकाळी सात वाजता महापूजा व अभिषेक केला जातो. दिवसभर जागरण गोंधळ, वाघ्या मुरळी नाचणे, तळी भंडार उचलणे, वारु सोडणे, नवस फेडणे, जावळ काढण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी यात्रा काळात मंदिरात व मंदिर परिसरात होते. रात्री आठ वाजता श्री खंडोबाची पालखी, घोडा मिरवणूक व विद्युत रोषणाई केली जाते. तसेच मानाचे नंदिध्वजाची मिरवणूकही काढली जाते. तिसऱ्या शेवटच्या रविवारी रात्री आठ वाजता शोभेची दारूचा कार्यक्रम होतो. मात्र, यंदा हे सर्व धार्मिक विधी मोजक्‍याच मानकऱ्यांच्या उपस्थितीत पार पाडले जाणार आहेत. याबाबत उद्या (गुरुवारी) आदेश काढले जाणार असून तत्पूर्वी, पोलिस आयुक्‍तांशी चर्चा केली जाईल, अशी माहिती महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shri Kshetra Khandoba's Yatra canceled! Only standard bearers are allowed for religious ceremonies