रस्त्यावरची लढाई लढणाऱ्या "स्वाभिमानी'ने उघडले मंगळवेढा तालुक्‍यात खाते ! सहा उमेदवार विजयी 

हुकूम मुलाणी 
Thursday, 21 January 2021

मंगळवेढा तालुक्‍यामध्ये ऊसदर आणि पीक विमा यावरून सातत्याने आंदोलने करून रस्त्यावरील लढाई लढत शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घेतलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नुकत्याच झालेल्या 23 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सहा उमेदवार विजयी झाले आहेत. 

मंगळवेढा (सोलापूर) : मंगळवेढा तालुक्‍यामध्ये ऊसदर आणि पीक विमा यावरून सातत्याने आंदोलने करून रस्त्यावरील लढाई लढत शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घेतलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नुकत्याच झालेल्या 23 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सहा उमेदवार विजयी झाले आहेत. याद्वारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवेढा तालुक्‍यातील स्थानिक स्वराज्य संस्थेत खाते उघडले आहे. 

गेल्या चार वर्षांपासून सातत्याने शेतकऱ्यांना पीक विमा, दुष्काळ निधी, ऊसदर आदींसाठी संघर्ष करावा लागत आहे. त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले तर खरीप पीक विमा 2018 साठी कंपनीच्या सोलापूर कार्यालय येथे धडक मारून तालुक्‍यात पीक विम्यापासून वगळलेल्या जवळपास 4012 शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळवून दिला. याशिवाय नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर देणे, शेतकऱ्यांना विजेच्या प्रश्नासाठी महावितरणच्या कार्यालयात सातत्याने पाठपुरावा करणे, उजनीचे पाणी कालव्याद्वारे वेळेत सोडणे तसेच दुष्काळ निधीचे वाटप वेळेत करावे, अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे तातडीने करावे, यंदाच्या गळीत हंगामापूर्वी ऊसदर निश्‍चित करावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सातत्याने संघर्षाची भूमिका घेतली आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला आहे. 

संघटनेचे पश्‍चिम महाराष्ट्र युवा आघाडीचे उपाध्यक्ष ऍड. राहुल घुले, श्रीमंत केदार, संतोष बिराजदार, अनिल बिराजदार, शंकर संगशेट्टी, हर्षद डोरले, आबा खांडेकर, दत्तात्रय गणपाटील यांच्या संघर्षशील भूमिकेमुळे शेतकऱ्यांना या संघटनेबद्दल आस्था वाटू लागली. नुकत्याच झालेल्या 23 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये तालुकाध्यक्ष श्रीमंत केदार हे डोणजमध्ये विजयी झाले. या संघटनेचे दत्तात्रय गणपाटील यांच्या मातोश्री व शाखाध्यक्ष नितीन घुले मरवडे ग्रामपंचायतीत विजयी झाले. तर अरळीचे शाखाध्यक्ष मल्लिकार्जुन भांजे तसेच रतन रजपूत यांच्या मातोश्री, लक्ष्मण जमदाडे यांच्या पत्नी या निवडणुकीत विजयी झाल्या आहेत. 

या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील गावगाड्यात यश मिळू लागल्यामुळे संघटनेत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा विश्वास वाढीस लागला आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Six candidates of Swabhimani Shetkari Sanghatana won the Gram Panchayat election in Mangalwedha taluka