अक्कलकोटसाठी शनिवार चिंता वाढविणारा; नवीन सहा कोरोनाबाधितांची भर 

राजशेखर चौधरी 
शनिवार, 27 जून 2020

अक्कलकोटची कोरोनाची स्थिती (27 जून) 

  • एकूण कोरोनाबधित रुग्ण : 62 
  • आतापर्यंत एकूण मृत्यू : 04 
  • बरे होऊन घरी गेलेले रुग्ण संख्या : 12 
  • उपचार सुरू असलेले रुग्ण : 46 

अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट तालुक्‍याला सलग चौथ्या दिवशी कोरोना रुग्णांची मोठ्या संख्येने भर पडली असून आज शनिवारी नव्याने सहा रुग्ण आढळले असून आता तालुक्‍याची एकूण कोरोनाबधित रुग्णांची संख्या 62 वर पोचल्याची माहिती तहसिलदार अंजली मरोड यांनी दिली आहे. 

बुधवारी घेण्यात आलेले 126 स्वॅब प्रलंबति होते. त्यापैकी शनिवारी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार सहा जण कोरोना पॉझिटिव्ह आले असून 100 रिपोर्ट निगेटीव्ह, सात रिपोर्ट प्रलंबित असून 6 स्वॅब रद्द करण्यात आले आहे. आज सलगर दोन, समर्थनगर एक, बुधवार पेठ एक, इंदिरा नगर झोपडपट्टी, आझाद नगर एक असे एकूण सहा कोरोनाबधित रुग्ण आढळले आहेत. यामुळे आता नागरिकांत मोठ्या प्रमाणात चिंता व्यक्त केली जात असून भीतीचे वातावरण पसरले आहे. कोरोना ही स्थिती आटोक्‍यात कशी आणि केव्हा येणार याविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. केंद्र व राज्य सरकारने कोरोना रुग्ण संख्या वाढू नये यासाठी जी काही मार्गदर्शक तत्वे नागरिक व व्यापारी वर्ग यांच्यासाठी आखून दिली होती. त्याची काटेकोर अंमलबजावणी होत नाही. त्यामुळेच ही परिस्थिती उद्धभवली आहे, हे मात्र नक्की आहे. पोलिस प्रशासन व नगरपरिषद प्रशासन यांनी लॉकडाऊन काळात नागरिकांचे प्रबोधन केले. मात्र अद्याप नागरिकांनी याकडे लक्ष दिले नसल्याचे चित्र आहे. दरम्यान अक्कलकोट तालुक्‍यातील पूर्वीचे प्रलंबित सात तर शुक्रवारी घेतलेल्या 53 अशा एकूण 60 स्वॅबच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Six corona patients were found in Akkalkot taluka on Saturday