
शहरातील आरटीओ कार्यालयात केवळ जानेवारी महिन्यात सहा हजार जणांची लर्निंग लायसेन्ससाठी नोंदणी केल्याचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून सांगण्यात आले. 23 मार्च ते 21 जून या दरम्यान कोरोना महामारीमुळे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बंद होते. या काळात कुठल्याही प्रकारची नोंदणी झाली नव्हती.
सोलापूर : शहरातील आरटीओ कार्यालयात केवळ जानेवारी महिन्यात सहा हजार जणांची लर्निंग लायसेन्ससाठी नोंदणी केल्याचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून सांगण्यात आले. 23 मार्च ते 21 जून या दरम्यान कोरोना महामारीमुळे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बंद होते. या काळात कुठल्याही प्रकारची नोंदणी झाली नव्हती. लर्निंग लायसेन्ससाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे शुल्क तीनशे रुपये आहे. यासाठी सर्व कार्यालयांच्या सूचना पार पडल्यानंतर एक महिन्याच्या काळात घरपोच परवाना मिळतो.
बहुतांश लोकांना परवाना घरपोच मिळत नाही. त्यामुळे ते उमेदवार एजंटांचा सहारा घेतात. एवढे असतानाही एजंटांना कार्यालयात प्रवेश दिला जात नाही, असे सांगण्यात आले. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये मास्क, सॅनिटायझर यांचा विसर पडल्याचे देखील पाहायला मिळत आहे. कार्यालयाच्या बाहेर अनेक एजंट दुकान मांडून बसलेले आहेत. या परिसरात येणाऱ्या नागरिकांकडून कोरोना विषाणूपासून संरक्षणासाठी असलेल्या कुठल्याही नियमांचे पालन होताना दिसून येत नाही.
या ठिकाणी लर्निंग लायसन एजंटांकडून काढावयाचे झाल्यास दुचाकीसाठी दोन ते अडीच हजार रुपये मोजावे लागतात. तर चारचाकी वाहनाच्या परवान्यासाठी साडेचार हजार रुपये नागरिकांना मोजावे लागतात. यामध्ये त्यांना प्रशिक्षणही दिले जाते.
म्हणून एजंटांचे फावते !
पैसे जास्त गेले तरी चालतील पण काम वेळेवर झाले पाहिजे, अशी प्रत्येकाची आशा असते. आज एकविसाव्या शतकात आणि धावपळीच्या जीवनात कार्यालयीन कामकाज वेळेवर होईल हे सांगता येत नाही. शासकीय प्रक्रियेतील अधिकारी वेळकाढू प्रवृत्तीचे असतात. त्यामुळे अनेक जण एजंटांचा सहारा घेतात.
दररोज तीनशे जणांची संगणक चाचणी
कार्यालयामार्फत कोरोनाविषयीच्या नियमांची योग्य प्रकारे काळजी घेण्यात आली. नोंदणी झाल्यानंतर दररोज 250 ते 300 लोकांची संगणक चाचणी असते. परीक्षेसाठी 20 प्रश्न ठेवलेले असतात. यामध्ये 12 प्रश्न बरोबर आले की तो उमेदवार पास होतो. त्यालाच परवाना दिला जातो. या परीक्षेसाठी साधारणतः पंधरा मिनिटे लागतात.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात कोरोना नियमांचे पालन केले जात आहे. कोणत्याही नियमांचे उल्लंघन केले जात नाही. लर्निंग लायसेन्ससाठी नोंदणी ही करावीच लागते. नोंदणी केल्यानंतर संबंधित व्यक्तींना एसएमएस येतो. त्यांना परीक्षेची तारीख कळविली जाते.
- संजय डोळे,
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर
संपादन : श्रीनिवास दुध्याल