कुरनूर धरण परिसरात पहिल्यांदाच आढळला छोटा क्षत्रबलाक पक्षी ! 

Kshatrabalak
Kshatrabalak

अक्कलकोट (सोलापूर) : कुरनूर (ता. अक्कलकोट) येथील बोरी धरण परिसरात पहिल्यांदाच छोटा क्षत्रबलाक पक्षी आढळला आहे. त्यामुळे या भागातील पक्षीप्रेमी व निसर्गप्रेमी नागरिकांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

पक्षी वर्गातील सिकोनिफॉर्मिस गणातील हा एक पक्षी असून, या गणात बलाक, बगळा, करकोचा, आयबिस, दर्वीमुख व रोहित या पक्ष्यांचा समावेश होतो. बलाकांचे क्षत्रबलाक, लहान क्षत्रबलाक, मुग्धबलाक, लोहबलाक, कृष्णबलाक व चित्रबलाक असे प्रकार आहेत. त्यातील दुर्मिळ अशा लहान क्षत्रबलाक पक्ष्याची अधिवास नोंद कुरनूर धरणावर झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून कुरनूर धरण परिसर देश-विदेशातील पक्ष्यांचा अधिवास बनत चाललेला आहे. धरण परिसरात अतिशय दुर्मिळ पक्ष्यांच्या नोंदी झालेल्या आहेत. 

कुरनूर धरणाचा परिसर हा झाडीझुडपी, धरणात बेटासारखा भाग, डोंगराळ परिसर, शांततामय वातावरण, नैसर्गिक वातावरण यामुळे देश-विदेशातील पक्ष्यांना आकर्षित करतो. यामुळे धरणाजवळ असलेल्या चपळगावातील वन्यजीव छायाचित्रकार शिवानंद हिरेमठ यांनी पहिल्यांदा या छोट्या क्षत्रबलाक पक्ष्याची नोंद व छायाचित्रण केले आहे. रविवारी (ता. 27) रोजी ऋतुराज कुंभार, महादेव डोंगरे, रत्नाकर हिरेमठ, सचिन पाटील, नीलकंठ पाटील, नीलेश भंडारी, सुशांत कुलकर्णी, संतोष धाकपाडे, विनय गोटे आणि अजय हिरेमठ आदींसोबत पक्षी निरीक्षण करत असताना, अतिशय कमी प्रमाणात सोलापूर जिल्ह्यात यापूर्वी दिसलेल्या आणि कुरनूर धरण परिसरात पहिल्यांदाच या पक्ष्याची नोंद झाली आहे. 

छोटा क्षत्रबलाकाबद्दल माहिती... 
छोटा क्षत्रबलाक याला इंग्रजीत "लेसर एड्‌ज्युएंट स्टोर्क' असे म्हणतात. आकारामध्ये गिधाडापेक्षा मोठा असतो. केरळ, बांगलादेश, ईशान्य भारत आणि श्रीलंका येथे हा पक्षी जास्त प्रमाणात आढळतो. भारतातील इतर राज्यांत हा पक्षी सहसा आढळत नाही. हा निवासी असून स्थानिक स्थलांतर करतो. भटका या विभागात मोडतो. कमी होत चाललेल्या संख्येमुळे हा पक्षी धोकाप्रवण स्थितीत आलेला आहे. नर आणि मादी सारखेच दिसतात. शरीराचा वरील भाग धातूवत काळा दिसतो. खालील अंग पांढरा आहे. हा पक्षी एकटा राहणारा, जिथे विपुल पाणी आहे अशा ठिकाणी आढळतो. याचे खाद्य मासे, बेडूक, सरपटणारे प्राणी असून, नोव्हेंबर ते जानेवारी याचा विणीचा हंगाम असतो. धरणाच्या परिसरात छोटा क्षत्रबलाक दिसल्याने वन्यजीव प्रेमी आणि पक्षी अभ्यासकांनी आनंद व्यक्त केला आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com