आगीमुळे `या` शहरात 3.54 कोटींचे नुकसान

विजयकुमार सोनवणे
गुरुवार, 9 एप्रिल 2020

प्रत्येक 10 किलोमीटरच्या मागे एक केंद्र असा शासनाचा निकष आहे. शहराचे क्षेत्रफळ 179 चौरस किलोमीटर आहे. त्यानुसार 18 केंद्रे असणे आवश्‍यक आहे. प्रत्यक्षात पाचच केंद्रे आहेत. लोकसंख्येच्या प्रमाणानुसार 13 वाहने अपेक्षित आहेत, प्रत्यक्षात नऊ आहेत. 
- केदारनाथ आवटे, अधीक्षक 
महापालिका अग्निशमन दल 

 सोलापूर : महापालिका हद्दीत गेल्या वर्षभरात लागलेल्या आगीमुळे तीन कोटी 57 लाख 15 हजार 500 रुपयांचे नुकसान झाले. तर एक कोटी 60 लाख रुपयांची मालमत्ता नुकसानीपासून वाचवली, अशी माहिती दलाचे अधीक्षक केदार आवटे यांनी  "सकाळ'ला दिली. 

प्रतिमेत याचा समावेश असू श्‍ाकतो: एक किंवा अधिक लोक, लोकं उभी आहेत आणि बाहेरील
अग्निशमन दलातील जवानांना मार्गदर्शन करताना अधीक्षक श्री. केदारनाथ आवटे 

दरवर्षी 14 ते 20 एप्रिलदरम्यान अग्निशमन सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. यंदा कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले नाही. वर्धापन दिनादिवशी सादर करण्यात येणारी प्रात्यक्षिकेही रद्द करण्यात आली आहेत, असे श्री. आवटे यांनी सांगितले. ते म्हणाले, ""देशात आगीमुळे दरवर्षी हजारो कोटी रुपयांचे नुकसान होते. अनेकजणांचे प्राणही जातात. आगीमुळे होणाऱ्या मालमत्तेच्या नुकसानीची भरपाईही परत भरून निघू शकत नाही. विमा कंपनीद्वारे मिळणारी मदतही पुरेशी नसते. सुमारे 80 टक्के मालमत्तेचा विमा उतरविलेला नसतो. त्यामुळे हजारो लोकांचे संसार धुळीस मिळतात, हजारो कामगार बेकार होतात. बऱ्याच वेळा बेपर्वाई व सुरक्षिततेचे नियम न पाळल्यामुळे आग लागते. या पार्श्‍वभूमीवर आगीपासून वाचण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांची माहिती सप्ताहांमध्ये दिली जाते. मात्र यंदा हे कार्यक्रमही होणार नाहीत.'' 

श्री. आवटे म्हणाले, ""राज्य शासनाने दहा शहरांत आपत्ती व्यवस्थापन केंद्रांची स्थापना केली आहे. त्यानुसार सोलापूरवर उस्मानाबाद व लातूर या जिल्ह्यांची जबाबदारी आहे. हे दोन्ही जिल्हे भूकंपप्रवण आहेत. या पार्श्‍वभूमीवर काही दुर्घटना झाल्यास वाहनांची गरज भासणार आहे. सध्या दलाकडे एक "ऍडव्हान्स रेस्क्‍यू टेंडर' आहे. मात्र, लातूर किंवा उस्मानाबाद जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थिती उद्‌भवल्यास हे वाहन त्या ठिकाणी पाठवावे लागणार आहे. त्यामुळे कोणत्याही स्थितीला सामोरे जाण्यास सक्षम असेल, असे आणखी एक स्पेशल रेस्क्‍यू टेंडर असण्याची गरज आहे. मोठ्या दुर्घटनेच्या वेळी करावयाच्या कामाबाबत प्रशिक्षण देण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाठवावे लागणार आहे.'' 

        अग्निशमन दलाचा वार्षिक आढावा 
  घटना                                 महापालिका हद्द 
1. आगी विझवल्या                          354 
2. अपघात ठिकाणी मदतकार्य            44 
3. आगीमुळे आर्थिक नुकसान       तीन कोटी 57 लाख 
4. जखमींची संख्या                             19 
5. आग व अपघातांमध्ये मृत्यू                 07 
6. मालमत्ता वाचविली                 एक कोटी 60 लाख 
7. व्हीआयपी व इतर बंदोबस्त                 24 
8. स्पेशल रेस्क्‍यू                                    57 

-


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: So many crores of damage in solapur city due to fire in last year