Malegaon forest
Malegaon forest

सामाजिक वनीकरण विभागाने केली "मळेगावच्या फुफ्फुसा'ची पाहणी 

मळेगाव (सोलापूर) : बार्शी तालुक्‍यातील मळेगाव येथील श्री नर्मदेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ व सामाजिक वनीकरण विभाग, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने नर्मदेश्वर शिक्षण संस्थेच्या बारा एकर जमिनीवर पाच हजार 500 वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. मळेगावचे फुफ्फुस म्हणून ओळख झालेल्या वनपरिक्षेत्राची पाहणी सामाजिक वनीकरण विभागामार्फत करण्यात आली. 

या वेळी विभागीय उपवनाधिकारी विलास शिंदे, वनक्षेत्रपाल तुकाराम लंगडे, निजाम मुलाणी, संस्थेचे संचालक विलास मिरगणे, प्राचार्य विकास बोराडे, गौस शेख, कचरू पटेल, भोलेनाथ वाघ, गुलाब शेख, उमेश क्षीरसागर, मुकुंद डोईफोडे, विनोद दीक्षित, राजेंद्र बागूल, विजय वाघमारे, दशरथ ननवरे, भगवान काळे आदी उपस्थित होते. 

"वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे' या संत तुकाराम महाराज यांच्या उक्तीप्रमाणे कर्मवीर गडसिंग (गुरुजी) यांनी संस्थेच्या सोलापूर, पुणे, रायगड जिल्ह्यातील विविध शाखेत शेकडोंच्या संख्येने वृक्षलागवड करीत पर्यावरणाचे संवर्धन करून एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांचे आदर्श विचार व वृक्षप्रेम समोर ठेवत संस्थेच्या सचिवा सखूबाई गडसिंग, सहसचिव हेमंत गडसिंग व नर्मदेश्वर परिवाराने संस्थेची बारा एकर जमीन सामाजिक वनीकरण विभागास वृक्ष लागवडीसाठी दिली आहे. त्यात विविध प्रकारच्या पाच हजार 500 वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. पिंपळ, जांभूळ, तुती, कडुलिंब, आंबा, चिंच, आवळा, गुलमोहर, उंबर, पिवळी आदी रोपांची लागवड करण्यात आली आहे. अवघ्या 11 महिन्यांत 10 ते 12 फुटांपर्यंत वृक्षांची वाढ झाली आहे. 

बार्शी-तुळजापूर रोडवर मळेगाव पासून एक किलोमीटर अंतरावर असलेला प्रकल्प बहरलेल्या वृक्षामुळें व निसर्गरम्य वातावरणामुळे पर्यावरण प्रेमीसाठी एक थांबा झाला आहे.झालेली 

वृक्षांची वाढ, केलेले उत्कृष्ट नियोजन, क्षेत्रिय कामाचा उंचावलेला दर्जा पाहून विभागीय उपवनाधिकारी विलास शिंदे व वनक्षेत्रपाल तुकाराम लंगडे यांनी वनविभागाचे निजाम मुलाणी व भोलानाथ वाघ यांचे अभिनंदन केले. तसेच नर्मदेश्वर संस्थेने वनविभागाला वृक्षलागवडीसाठी जमीन दिल्याबद्दल संस्थेचे आभार मानले. या प्रकल्पासाठी शासकीय खर्चाची बचत करीत मळेगाव ग्रामस्थांनी पाण्याची उपलब्धता करून दिली आहे. 

मळेगाव येथील प्रकल्प हा सोलापूर जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट प्रकल्प असल्याचे विलास शिंदे यांनी सांगितले. वृक्षलागवड प्रकल्पामुळे मळेगाव हे गाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. विभागीय वनाधिकारी सुवर्णा माने, बार्शीचे वृक्षमित्र मधुकर डोईफोडे, पुणे वनविभाग, उस्मानाबाद वनविभाग यांनी प्रकल्पास भेट देऊन केलेल्या कामाचे कौतुक केले. 

या वेळी हेमंत गडसिंग म्हणाले, कर्मवीर गडसिंग (गुरुजी) यांनी नेहमीच समाजहित डोळ्यासमोर ठेवत शैक्षणिक, सामाजिक व धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांचे समाजसेवेचे व्रत श्री नर्मदेश्वर शिक्षण संस्थेने पुढे अखंडपणे सुरू ठेवले आहे. संस्थेने बारा एकर जमीन वृक्षलागवडीसाठी दिल्याने भविष्यात पर्यावरण संवर्धनासाठी नक्कीच फायदा होणार आहे. 

विभागीय उपवनाधिकारी विलास शिंदे म्हणाले, सामाजिक वनीकरण विभाग, सोलापूर यांच्या वतीने मळेगाव येथे राबविण्यात आलेला वृक्षलागवडीचा प्रकल्प हा जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट प्रकल्प आहे. अवघ्या 11 महिन्यांत 10 ते 12 फुटांपर्यंत झालेली वृक्षांची वाढ खरंच कौतुकास्पद आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com