दिसला रस्त्यावर की घाल गाडीत ; सोलापुरात "मोकाटां'ना पोलिसांचा प्रसाद 

विजयकुमार सोनवणे
सोमवार, 23 मार्च 2020

"त्या' लोकप्रतिनिधींवर देशद्रोहीचा गुन्हा दाखल करावा 
सोलापूर पोलिसांनी उनाडक्‍या करीत फिरणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई सुरु केली. त्यावेळी काही ठिकाणी पोलिसांशी हुज्जत घालण्याचे प्रकारही झाले. काही दुचाकीस्वारांनी "अण्णा', "दादा', "मालक', "बापू', "बॉस' यांना मोबाईल लावून पोलिसांवर "इंप्रेशन' मारण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी कुणालाही न जुमानता सर्वांवर कारवाई केली. जमावबंदीचा आदेश मोडलेल्यांवर कारवाई करू नये असे सांगण्यासाठी साठी कुण्या लोकप्रतिनिधींचा फोन आला तर, संबंधित लोकप्रतिनिधीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी होत आहे.

सोलापूर  : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जमाबंदीचा आदेश असूनही केवळ टाईमपास म्हणून शहरातील रस्त्यावरून हुंदडणाऱ्या सोलापुरातील "मोकाटां'ना पोलिसांनी लाठीचा प्रसाद देण्यास सुरुवात केली आहे. अनेकांना पकडून पोलिस ठाण्यात नेले असून, त्यांची वाहनेही ताब्यात घेण्यात आली आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जमाव करू नका, विनाकारण रस्त्यावर हिंडू नका असे वारंवार आवाहन करूनही काहीही काम नसताना रस्त्यावर उतरलेल्यांना लाठीचा प्रसाद खावा लागला आहे. रस्त्यावर विनाकारण फिरताना आढळून आला तर त्याला थेट वायरलेस गाडीत घातले जात आहे. 

प्रतिमेत याचा समावेश असू श्‍ाकतो: एक किंवा अधिक लोक, गर्दी आणि बाहेरील
कोरोना व्हायरसमुळे भविष्यात काय स्थिती निर्माण होऊ शकते याचे काहीच गांभीर्य नसलेले सोलापूरकर आज असे रस्त्यावर मुक्तपणे हिंडत होते

कोरोनाचा प्रसार हा संसर्गातून होतो. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका, विनाकारण गर्दी करू नका, घरी कुटुंबियांसमवेत वेळ घालवा, बाहेर पडला तर कारवाई होईल, अशा सूचना वारंवार देऊनही त्याचे पालन न करण्याची भूमिका सोलापुरातील काही अतिउत्साहींनी घेतली आणि निर्मनुष्य रस्त्यांवरील "राईड'चा अनुभव घेण्यासाठी बाहेर पडले. त्यामुळे रस्त्यांवरील गर्दी वाढली, परिणामी प्रशासनाने केलेल नियोजन बिघडण्याची स्थिती निर्माण झाली. हे प्रकार थांबवायचा असेल तर ठोस कारवाईचेच पाऊल उचलण्याची गरज असल्याचे दिसल्याने पोलिसांनी रस्त्यावर मोकाटपणे हिंडणाऱ्यांवर कारवाईस सुरुवात केली आहे. 

सकाळच्या वेळीही शहराच्या अनेक भागात नागरीक गटागटाने चर्चा करीत उभे असल्याचे चित्र होते. गर्दी न करण्याचे वारंवार आवाहन करण्यात येऊनही त्यास प्रतिसाद मिळेना, त्यावेळी मात्र पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली. कोरोनासंदर्भात सोलापूरकरांनी अजुनही गांभीर्याने घेतले नाही हेच या घटनांतून दिसून येत आहे. रस्त्यावर गर्दी केल्यास कोरोना विषाणू प्रादुर्भावाचा किती भयानक परिणाम होतो याचे व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रसारीत होत आहे. ते पाहूनही सोलापूरकरांना त्याचे गांभीर्य वाटलेले नाही. त्यामुळे पोलिसांनी सुरु केलेल्या या कारवाईचे अनेकांनी स्वागत केले आहे आणि जे विनाकारण रस्त्यावर फिरून वातावरण बिघडवत आहेत, त्यांच्यावर जास्तीत जास्त कडक कारवाई करण्याची मागणी आता होऊ लागली आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: solapur carfew action against two wheelar on road