सोलापूर शहरातील वर्दळीच्या ठिकाणी सॅनिटायझरची फवारणी सुरु 

विजयकुमार सोनवणे
शनिवार, 28 मार्च 2020

सोलापूर शहरात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शहर परिसरामध्ये जिल्हा प्रशासन आणि पालिका प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील गर्दीच्या ठिकाणी सोडियम हायपोक्‍लोराईड रसायनयुक्त पाण्याची फवारणी करण्यात येणार आहे. 
- श्रीकांचना यन्नम, महापौर 
सोलापूर महापालिका

सोलापूर : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने शनिवारपासून शहरातील वर्दळीच्या ठिकाणी सॅनिटायझरची फवारणी सुरु केली. महापालिकेकडून वारंवार मागणी करूनही प्रतिसाद मिळत नसल्याने नगरसेविका फिरदोस पटेल यांनी स्वखर्चाने प्रभागात "सॅनिटायझर'ची फवारणी सुरु केली होती.

प्रशासनाने घेतली दखल 
"महापालिकेची उदासीनता, नगरसेविकेचा पुढाकार' ही बातमी "ई सकाळ' पोर्टलवर प्रसिद्ध झाल्यावर प्रशासनाने तातडीने दखल घेत शहरात फवारणी सुरु केली. शहरातील प्रमुख मंड्यामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचेही छायाचित्रांच्या माध्यमातून वारंवार निदर्शनास आणून दिले होते. त्यानुसार विविध मंड्यांमध्ये विक्रेता आणि ग्राहकांमध्ये अंतर राहिल अशी रचना करण्यात आली आहे. 

फवारणीच्या कामाला सुरुवात
महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या उपस्थितीत फवारणीच्या कामाला सुरुवात झाली. यावेळी आरोग्याधिकारी डॉ. संतोष नवले, अग्निशमन दलाचे अधीक्षक केदार आवटे उपस्थित होते. शहरातील भाजी मार्केट, पेट्रोल पंप तसेच गर्दीच्या ठिकाणी सोडियम हायपोक्‍लोराईड रसायनयुक्त पाण्याची फवारणी अग्निशमक दलाच्या साहयाने आज नवी पेठ येथून सुरवात करण्यात आले. कस्तुरबा मार्केट, लक्ष्मी मार्केट, सत्तर फूट रोड येथील भाजी मार्केट आदी ठिकाणी फवारणी करण्यात आली. 

ताप, सर्दी, खोकला असल्यास डॉक्‍टरला दाखवा
देशात व राज्यात कोरोना संसर्ग रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. नागरीकांनी खोकताना तोंडाला रुमाल अथवा टिश्‍यू पेपर चा वापर करावा तसेच हात धुवावे, आणि समोरच्या व्यक्तींशी बोलताना अंतर बाळगावे. ताप, सर्दी, खोकला असल्यास त्वरीत डॉक्‍टरकडे दाखवावे. गरज असल्यासच घराबाहेर पडावे अन्यथा घरीच थांबावे, असे डॉ. नवले यांनी सांगितले. 

प्रतिमेत याचा समावेश असू श्‍ाकतो: एक किंवा अधिक लोक, लोकं उभी आहेत, लोक चालत आहेत आणि बाहेरील
सोलापूर - सुंदरमनगर येथील मंडईत केलेली व्यवस्था

मंड्यामध्ये सुरक्षेची व्यवस्था 
शहरातील विविध मंड्यामध्ये ग्राहकांची गर्दी एका ठिकाणी होणार नाही यासाठी दक्षता घेण्यात आली आहे. त्यानुसार शहरातील लक्ष्मी मंडई, संदरमनगर, राहूल नगर, बाळे, कस्तुरबा मंडई या ठिकाणी वर्तुळाकार कडे करण्यात आले आहे. त्यामुळे मंड्यामध्ये गर्दी होणार नाही. तसेच प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेत भाजीची विक्री करावी, तसेच नागरिकांनीही एकाच वेळी गर्दी न करता दिलेल्या वेळेत टप्याटप्याने खरेदीसाठी यावे. तसेच मंडईत जाण्यापूर्वी त्या ठिकाणी लावण्यात आलेल्या टाकीच्या पाण्यातून हात स्वच्छ धुवावेत तसेच परततानाही हात धुवावेत, असे आयुक्त दीपक तावरे यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: solapur city sanitayzer in market