रस्त्यावर जल्लोष ; सोलापूरकरांना पडला "कोरोना'चा विसर  (VIDEO)

विजयकुमार सोनवणे
रविवार, 22 मार्च 2020

सोलापूरकर अद्याप बेफीकीरच 
रविवारी सायंकाळी पाच वाजल्यानंतर सोलापूर शहरात झालेल्या जल्लोषाचे स्वरुप पाहता स्मार्ट सोलापूरकर "कोरोना'बाबत बेफीकर असल्याचे स्पष्ट झाले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने एकीकडे रेल्वे बंद, एसटी बंद आणि शासकीय कार्यालयातील गर्दी कमी करण्यासाठी मोठे निर्णय घेतले असताना त्याचे काहीच गांभीर्य सोलापूरकरांना नसल्याचे दिसून आले. 

सोलापूर : दुपारचे साडेचार वाजले आणि सोलापुरातील वसाहती, गल्ली, छोट्टा चाळी येथील हजारो नागरीक पाच वाजण्याची वाट पाहू लागले. पाच वाजले आणि शहर परिसरात एकच जल्लोष सुरु झाला. कुणी ताट-वाट्या वाजविले, कुणी घंटीनाद केला, तर कुणी शंखनाद. अपार्टमेंटमधील रहिवाशांनी आपापल्या बाल्कनीत उभारून टाळ्या वाजविल्या आणि थाळीनादही. या जल्लोषात देशावर "कोरोना'चे संकट आहे याचा जणू सर्वांनाच विसर पडला होता. 

हे आधी वाचा - स्मार्ट सोलापूरकर पोचले सातच्या आत घरात...

सर्वत्र निर्माण झाले चैतन्य 
दाट लोकवस्तीचा परिसर असलेल्या भागात ज्येष्ठांबरोबरच युवक, महिला, युवती आणि लहान मुलांनी जल्लोष केला. सुपर मार्केट परिसरातील काही उत्साही तरुणांनी फटाक्‍यांची आतषबाजी केली. भवानी पेठ, तुळजापूर वेस, बलिदान चौक, शाहीर वस्ती, शेळगी, भय्या चौक, रामलाल चौक, सुपर मार्केट परिसर, जुळे सोलापूर, मराठा वस्ती, कुंभार वेस, वैदु वस्ती, विडी घरकूल परिसर, शहराच्या विविध भागातील सोसायट्या, जुळे सोलापुरातील विविध सोसायट्या या ठिकाणी एकाच वेळी थाळीनाद, घंटानाद सुरु झाल्याने वातावरणात एक प्रकारचे चैतन्य निर्माण झाले होते. वास्तविक कोरोना हद्दपार करण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्यांप्रती कृतज्ञता म्हणून आपापल्या घरातून थाळीनाद किंवा घंटानाद करावा, टाळ्या वाजवाव्यात असे नियोजन होते. मात्र सोलापुरकरांनी नेहमीप्रमाणे आपल्या पद्धतीने गांभीर्य न  अोळखता जल्लोष केला. 

प्रतिमेत याचा समावेश असू श्‍ाकतो: एक किंवा अधिक लोक, बूट आणि बाहेरील
सोलापूर - जमावबंदीचा आदेश मोडून रस्त्यावर जल्लोष सुरु झाल्याने पोलिसांनी हस्तक्षेप करत जमाव पांगविला

पोलिसांनी केला हस्तक्षेप 
"कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर सोलापूर शहरात जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. पाच वाजल्यानंतर अनेकांनी हा आदेश डावलल्याचे दिसून आले. शहराच्या विविध भागात अक्षरशः उत्सवाचे स्वरुप दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली आणि रस्त्यावर जमलेल्यांना पांगविण्याचे काम त्यांनी केले. पोलिस येईपर्यंत अनेक ठिकाणी नागरीक घोळक्‍याने रस्त्यावर थांबूनच होते. पोलिस आल्यानंतर मात्र नागरीकांनी आपापल्या घरी जाणे पसंत केले. 

चला पाहुया थाळीनाद, घंटानादचा जल्लोष (VIDEO)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: solapur corona carfew