सोलापूर महापालिकेच्या निवारा केंद्रात देशातील "इतक्‍या' स्थलांतरांची सोय 

विजयकुमार सोनवणे
शनिवार, 4 एप्रिल 2020

चार केंद्रे वाढवली 
स्थलांतरीत नागरिकांची संख्या वाढल्याने महापालिकेने आणखीन चार केंद्रे वाढवली आहेत. त्यामध्ये वोरोनोको प्रशाला, भारती विद्यापीट, लेप्रसी कॉलनी आणि उर्दू कॅम्प प्रशालेचा या नवीन केंद्रात समावेश आहे. 

सोलापूर : कोरोना आपत्तीच्या पार्श्‍वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून सोलापूर महापालिकेने सहा ठिकाणी निवारा केंद्र सुरु केले आहे. त्यामध्ये शनिवारअखेर 597 लोकांची सोय करण्यात आली. त्यामध्ये सर्वाधिक 224 स्थलांतरीत हे तामिळनाडुतील असून, 69 जण सोलापूर शहरासह महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील आहेत. स्थलांतरीतांची वाढती संख्या पाहता आणखी चार केंद्रे वाढविण्यात आली आहेत. 

प्रतिमेत याचा समावेश असू श्‍ाकतो: 1 व्‍यक्ती, झाड, लहान मूल आणि बाहेरील
सोलापूर ः स्नेहभोजन घेताना स्थलांतरीत 

लॉकडाऊनच्या काळात कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये याची खबरदारी जिल्हा व मनपा प्रशासनाकडून घेतली जात आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार मनपा प्रशासनाकडून ही मुळे सभागृह, बी.सी. हॉस्टेल, नूमवि प्रशाला, नॉर्थकोट प्रशाला, सोरेगाव एसआरपी कॅंप व बेघर निवारा केंद्र अशा सहा ठिकाणी लॉकडाऊनच्या काळात सोलापूरमार्गे मूळगावी परतणाऱ्या परराज्यांच्या लोकांच्या राहण्या-जेवणाची सोय करण्यात आली आहे. शनिवारी दुपारपर्यंत या केंद्रातील स्थलांतरांची एकूण संख्या (597) ः तमिळनाडू (224), राजस्थान (40), कर्नाटक (117), तेलंगणा व बिहार (प्रत्येकी एक), मध्यप्रदेश (97), उत्तरप्रदेश ( 18), महाराष्ट्र (69), आंध्र प्रदेश (9), आसाम (1), केरळ (16), दिल्ली (दोन), गुजरात व हरियाणा प्रत्येकी एक. 

प्रतिमेत याचा समावेश असू श्‍ाकतो: ३ लोक, Shashikant Kulkarni Shelgaokar समाविष्टित, लोकं उभी आहेत आणि बाहेरील
जीवनावश्यक साहित्य स्थलांतरितांना वितरीत करताना महापालिका अधिकारी 

महापालिकेने केलेली व्यवस्था 
सोलापूर जिल्ह्याबाहेरून आलेल्या जसे पुणे, मुंबई व इतर जिल्ह्यातून तसेच कर्नाटक, तेलंगणा व परदेशातून आलेल्या नागरिकांनी त्यांची माहिती महापालिकेच्या विभागीय कार्यालयात (झोन) कळविणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासाठी विभागीय कार्यालयानुसार अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांची माहिती या प्रमाणेः झोन एक (0217-2740370), झोन दोन(0217-2740371), झोन तीन (0217-2740372), झोन चार (0217-2740373), झोन पाच (0217-2740374), झोन सहा (0217-2740375),झोन सात (0217-2740399) झोन आठ (0217-2740322). घरात अलगीकरण केलेल्या व्यक्ती व त्यांच्या कुटुंबीयांचे सर्वेक्षण करण्यासाठी महापालिकेने 15 वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक नियुक्त केले आहे. दरम्यान, हात धुण्यासाठी महापालिका शहरातील 60 ठिकाणी पाण्याची टाकी बसविण्यात आल्या आहेत. 

पथकाकडून सर्व्हेक्षण सुरु 
राज्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारच्या आदेशानुसार व आपत्ती व्यवस्थापन समितीच्या वतीने देण्यात आलेल्या सूचनेनुसार या पथकाची नियुक्ती केली आहे. विभागीय कार्यालयनिहाय घरात अलगीकरण करण्यात आलेल्या व्यक्तींचे व त्यांच्या कुटुंबाचे सर्वेक्षण करण्याचे काम या पथकामार्फत केले जाणार आहे. या पथकात एक प्रमुख व त्यांना दोन सहायक अशी नियुक्ती केली आहे. या पथकात डॉ. जगदीश काळे, डॉ. मंजिरी कुलकर्णी, डॉ. अरुंधती हराळकर, डॉ. अतिश बोराडे, डॉ. जयंती आडके यांचा समावेश असून त्या पथकप्रमुख म्हणून काम पहात आहेत. 

क्वारंटाईन रुग्णांसाठी विशेष सुविधा 
केगाव येथील महिला प्रशिक्षण केंद्र, रामवाडी येथील मध्य रेल्वे प्रशिक्षण केंद्र, वाडिया हॉस्पिटल आणि आयडी हॉस्पिटल या ठिकाणी क्वारंटाईन सेंटर स्थापन करण्यात आले आहेत. केगाव येथील केंद्रात 25 बेडची व्यवस्था करण्यात आली असून, प्रसंगी आणखीन 25 बेडची व्यवस्था होऊ शकेल असे नियोजन करण्यात आले आहे. रामवाडी येथील केंद्रात 12 बेडची व्यवस्था करण्यात आली असून, दैनंदिन गरजेच्या वसूु उपलब्ध करण्यात आल्या आहेत. वाडिया हॉस्पिटलमधील तळमजला व पहिल्या मजल्यावर 11 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे, तर आयडी हॉस्पिटलमध्ये सहा बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व केंद्रांत गाद्या, उशी, चादर, बेडशिट, टूथपेस्ट, साबण, तेल, आरसा व बादलीची व्यवस्था करण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: solapur corporation corona carefw news