संचारबंदीत महापालिकेचे हे `काम` प्रगतीपथावर

विजयकुमार सोनवणे
गुरुवार, 26 मार्च 2020

जास्तीत जास्त दाखले तयार करण्याचे नियोजन 
जन्म व मृत्यू नोंदणी दाखल्यासाठी आतापर्यंत 25 ते 30 हजार अर्ज आले आहेत. मध्यंतरीच्या कालावधीत गर्दीमुळे दाखले वेळेत देण्यात तांत्रिक अडचणी होत्या. संचारबंदीमुळे आता हे काम वेगाने केले जात असून, जास्तीत जास्त दाखले तयार केले जाणार आहेत. 
- संदीप कुर्डे, उपनिबंधक 
जन्म-मृत्यू नोंदणी विभाग, सोलापूर महापालिका 

सोलापूर : संचारबंदी कालावधीचा फायदा घेत महापालिकेतील जन्म-मृत्यू नोंदणीचे दाखले बनविण्याचे काम वेगाने केले जात आहे. त्यामुळे सुमारे सात ते आठ हजार प्रलंबित दाखले या कालावधीत तयार होण्याची शक्‍यता आहे. 

कोरोना पार्श्‍वभूमीवर जमावबंदी आदेशाची अंमलबजावणी शहरात सुरू झाली आहे. त्यामुळे महापालिकेत प्रवेशबंदी करण्यात आली आहे. दरम्यान, गर्दी थांबविण्यासाठी जन्म-मृत्यूचे दाखले देण्याची कार्यवाही 31 मार्चपर्यंत स्थगित करण्यात आली होती. मात्र, संचारबंदी कालावधीत प्रलंबित दाखले बनविण्याच्या कामाचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार कामकाज करण्यात येत आहे. महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागात रोज सरासरी हजार दाखल्यांची मागणी होत आहे. आतापर्यंत अंदाजे 30 हजार दाखल्यांची मागणी करण्यात आली आहे. दाखल्यांसाठी होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाचा प्रसार होण्याच्या शक्‍यतेने कर्मचाऱ्यांनी काम बंद केले होते. 

प्रतिमेत याचा समावेश असू श्‍ाकतो: एक किंवा अधिक लोक, लोकं बसली आहेत, ताल‍िका आणि आंतरिक
संगणकावर दाखले तयार करताना महापालिका कर्मचारी 

नागरिकत्व सुधारणा कायदा अंमलात आल्यानंतर दाखले काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. लोकांची वाढती गर्दी पाहता येथे आयुक्तांनी कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली. त्यामुळे दाखले देण्यातील अडचण काही प्रमाणात दूर झाली आहे. दाखला देण्यासाठी जी तारीख नागरिकांना देण्यात आली आहे, त्या तारखेला दाखला मिळालाच पाहिजे, अशा सूचना त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना दिला आहे. कोरोना पार्श्‍वभूमीवर अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी होऊ लागल्याने कर्मचाऱ्यांनी काम बंद ठेवले होते. 

सोलापूर नगरपालिकेच्या कालावधीत 1927 ते 1930 च्याही दाखल्याची मागणी करण्यात आली आहे. हा दाखला तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. येथे अतिशय जुने दाखले आहेत, मात्र अनेक दाखल्यांचे रजिस्टर जीर्ण झाले आहे. त्यामुळे एखादे पान फाटले तर त्याचा फटका संबंधित नागरिकांना बसणार आहे. शिवाय रजिस्टर तपासणीचा परिसर अतिशय दाटीवाटीचा आहे. अशा कोंदट वातावरणात कर्मचाऱ्यांना काम करावे लागत आहे. तथापि दाखले बनविण्याचे काम प्रगतिपथावर असून जास्तीत जास्त दाखले या कालावधीत तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: solapur municipal corporation birth-death certificate work progress